तारांबळ : विद्युत महावितरणाच्या रामभरोसे कारभारासाठी आंदोलनअमरावती : विद्युत महावितरणाच्या रामभरोसे कारभारामुळे शुक्रवारी प्रहार कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे आंदोलन पुकारून एमआयडीसीच्या वीज केंद्रावरच रात्र काढली. सकाळी अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर वीज कर्मचाऱ्यांची सळो की पळोची स्थिती झाली होती. पवन नगरात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विद्युत महावितरणाच्या डीबीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. याबाबत तत्काळ विद्युत महावितरणाच्या एमआयडीसी केंद्रावर नागरिकांनी संपर्क केला. मात्र, तेथील फोन कोणीही उचलला नाही. त्यामुळे नागरिकांनी रेती टाकून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केला होता. मात्र, तरीसुध्दा आग आटोक्यात येत नव्हती. नागरिकांनी विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी रोष वाढला होता. शेवटी प्रहारच्या धीरज जयस्वाल यांच्यासह सागर दिवाण, पवन मुथुड, पंकज शिंदे, कनैय्या जयस्वाल, गोलू अर्डक, रुपेश चपाटे, नितीन डगवार, सचिन शिरभाते यांच्यासह आदिंनी एमआयडीसी केंद्र गाठले. मात्र, वीज केंद्र कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यालयसुध्दा उघडे होते, असे प्रहार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे डीबीला लागलेली आग विझण्याचे नाव घेत नव्हती तर, दुसरीकडे विद्युत कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते संप्तत झाले होते. त्यातच रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान पवन नगरातील डीबीवर स्फोट झाल्याने सर्वच परिसरातील वीज खंडित झाल्याची माहिती प्रहार कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयातच ठिय्या मांडून अवघी रात्र तेथेच काढली. सकाळी ७.३० वाजता अधिकारी व कर्मचारी वीज कार्यालयात पोहोचल्यावर त्यांना प्रहार कार्यकर्ते झोपलेले दिसले. त्यावेळी वीज दुरुस्तीचे कार्य युध्द स्तरावर सुरु झाले. (प्रतिनिधी)पोलिसांचे प्रयत्न निष्फळरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यावर प्रहार कार्यकर्ता वीज केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने धीरज जयस्वाल यांनी पोलिसांनाही कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. वीज अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, आम्ही याबाबत काही करु शकत नाही, असे त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांना सांगितले. - तर आम्ही आ. राणांच्या घरासमोर झोपणारवीज महावितरणाच्या भोंगळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत. रात्रीची वीज खंडित झाल्यावर एकही कर्मचारी वीज कार्यालयात तक्रार घेण्यासाठी उपस्थित नसतो. तसेच फोनवरही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर विद्युत महावितरणाचा भोंगळ कारभार आमदार रवी राणा सुधारू शकत नसतील तर यापुढे विद्युत प्रवाह खंडित झाल्यास आमदार रवी राणा यांच्या घरासमोर झोपू, असा इशारा प्रहारच्या धीरज जयस्वाल यांनी दिला आहे.
‘प्रहार’ने वीज केंद्रावरच काढली रात्र
By admin | Updated: May 10, 2015 00:32 IST