अमरावती, दि. 18- शहरातून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचे आदेश अपर परिवहन आयुक्तांनी ९ ऑगस्ट रोजी राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोमवार १४ ऑगस्टपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भरारी पथकामार्फत ही मोहीम राबविली जाईल.
क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात आणि रस्त्यांचेही नुकसान होत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे १५ दिवस अशा वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. याकारवाईकरिता प्रत्येक आरटीओ कार्यालयातील एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभागातील सर्व वायुपथकांमध्ये किमान एक मोटार वाहन निरीक्षक, एक सहायक मोटार वाहन निरीक्षक व दोन क्लार्क यांची नेमणूक केली आहे.
विशेष म्हणजे पथकाला ही कारवाई स्वत:च्या विभागात न करता परिवहन आयुक्तांनी ठरवून दिलेल्या दुसऱ्या कार्यालयात करावयाची आहे. तपासणी मोहिमेला सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली नाही. या मोहिमेवर सहपरिवहन आयुक्तांचा ‘वॉच’ राहणार असल्याची माहिती आहे. दरदिवशी किमान दहा वाहनांवर कारवाईचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ओव्हरलोड वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई सुरू आहे.-विजय काठोडे, प्रभारी आरटीओ