नुकसान : उभ्या पिकावर फिरविले रोटावेटरश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटात काहीही घडू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. कोणाच्याही ताब्यातून शेती मिळवायची झाल्यास सक्षम न्यायालयाचा आदेश प्राप्त करावा लागतो. परंतु धारणी पोलिसांनी असे न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना स्वत: न्यायाधीश बनून उभ्या शेतातील पिकावर नांगरणी करवून ताबा दिल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी नागझीरा गावात घडली. मौजे नागझीरा येथील शेत सर्वे नंबर ९९ हे बळीराम रामा, जीजी रामा, शिवराम रामा आणि ठेमाय झाल्या कास्देकर यांच्या संयुक्त मालकीत सातबारामध्ये नोंद आहे. ठेमाय झाल्या हिने या शेतात वाटणी होऊन १/३ हिस्सा मिळावा म्हणून २००९ मध्ये दिवाणी न्यायालय धारणी येथे वादपत्र दाखल केले होते. दरम्यान ठेमायच्या मुलांनी आपल्या हक्काचे १/३ जमीन ताब्यात घेऊन वहिती करू लागले. या प्रकरणात बळीराम यांनी आपले पक्ष न मांडल्याने प्रकरण खारीज करण्यात आले. हा निकाल २८ मार्च २०१४ रोजी लागला. तेव्हापासून बळीराम याने ताबा घेण्यासाठी कोणतेही वादपत्र दिवाणी न्यायालयात दाखल केले नाही. तरीदेखील दोन वर्षांपासून ताबा ठेमाय झाल्या यांच्याचकडे कायम होता. सध्या या १/३ शेतीवर ठेमायचे वारसदारांनी उन्हाळी मूंग व कांद्याची लागवड केली. दोन्ही पिके एक फुटापर्यंत वाढली होती. अशातच बळीराम रामाने पोलिसांच्या मदतीने व चिरीमिरी करून ताबा बळजबरीने घेण्याचा प्रकार सुरू केला. तत्पूर्वी बळीरामने मी केस जिंकलो, असे सांगत तहसीलदारांकडे ताबा देण्याचा अर्ज केला होता. मात्र दिवाणी न्यायालयाने ताबा कोणास द्यावा याबाबत आदेश केले नसल्याने नायब तहसीलदारांकडे ते अर्ज प्रलंबितच आहे. यादरम्यान बळीरामचे पोलिसांकडे साकडे घालणे सुरूच होते. पोलिसांसोबत सर्व प्रकारची ‘सेटींग’ झाल्यावर ३१ मार्च रोजी पोलिसांनी वाहितदारांच्या वारसदारांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून धारणी ठाण्यात आणले व बळीरामला ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याचे आदेश जमादाराने दिले. त्यामुळे उभ्या पिकावर सुसर्दा येथील ट्रॅक्टरद्वारे उभे पीक नष्ट करण्यात आले. यामुळे बीट जमादाराच्या या प्रकारामुळे आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे.अन्यायाची चौकशी कराउभ्या पिकाचा ताबा न्यायालयाचे आदेश असल्यावरही देता येत नाही, असे सर्वसामान्य न्यायाचे सिद्धांत आहे. त्यामुळे या प्रकरणात सिद्धांत व नियमाला बगल देऊन पोलिसांनी केलेल्या अन्यायाची चौकशी व्हावी, अशी आशा ठेमाय झाल्या नामक महिलेच्या वारसदारांना जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्याकडून आहे.
न्यायालयाचे आदेश झुगारून दिला शेतीचा ताबा
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST