जिल्हा बँकेत ‘सहकार’ची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:52+5:30

परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.  यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष.   स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून २१ मते प्राप्त करून विजय मिळविल्याचे घोषित करण्यात आले.

One-sided power of 'Sahakar' in District Bank | जिल्हा बँकेत ‘सहकार’ची एकहाती सत्ता

जिल्हा बँकेत ‘सहकार’ची एकहाती सत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात  आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे १३ संचालक निवडून आल्याने, बँकेवर ‘सहकार’चीच एकहाती सत्ता असेल, हे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे. परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.  यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष. 
  स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून २१ मते प्राप्त करून विजय मिळविल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने उमेदवारांच्या विजयांची मालिका सुरू होती. सर्वात शेवटी महिला आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. १७ संचालकांच्या निवडीसाठी ४८ उमेदवार रिंगणात कायम होते. त्यापैकी ३१ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. १,६८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत. 

दाेन आमदारांचा धक्कादायक पराभव
अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. दर्यापूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आमदार प्रकाश भारसाकळे यांना त्यांचे धाकटे बंधू सुधाकर भारसाकळे यांनी धोबीपछाड दिली, तर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून आमदार बळवंत वानखडे यांनी पराभव केला.

आ. पटेल कोर्टात जिंकले, मैदानात हरले
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नामनिर्देशनावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर, आ.पटेल यांनी कोर्टात धाव घेतली असता, त्यांचे नामनिर्देशन न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.  आमदार राजकुमार पटेल यांनी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना मैदानात पराभव स्वीकारावा लागला. आमदार बळवंत वानखडे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. 

हे ठरले ‘गेमचेंजर’
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार’ पॅनलची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखणे, मतदारांशी थेट संपर्क आणि वैचारिक बांधीलकी जोपासण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बँकेच्या कारभारावर आरोप, प्रत्यारोप होत असतानाही संयम बाळगला आणि ‘सहकार’ला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी ना.यशोमती ठाकूर, बबलू देशमुख हे खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरले.

मतमोजणीस्थळी सकाळपासूनच गर्दी
जिल्हा बँक निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उमेदवारांचे समर्थक, चाहत्यांनी मंगळवारी मतमोजणीस्थळी सकाळपासूनच गर्दी केली होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. मतमोजणीस्थळी ओळखपत्र असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला. मात्र, गाडगेनगर हा परतवाडा-दर्यापूरकडे ये-जा करणारा प्रमुख मार्ग असल्याने, बरेचदा गर्दीमुळे वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांची दमछाकही झाली.
 

 

Web Title: One-sided power of 'Sahakar' in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.