लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यात ३६२ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. यापैकी ५० प्रवाशांसोबत आरोग्य विभागाचा संपर्क न झाल्याने चिंता वाढली आहे. ३१२ प्रवाशांचा संपर्क झाला असून, यापैकी ३०७ प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. अन्य नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. या प्रवाशांना आठ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या. या नव्या व्हेरिएंटचा संक्रमणदर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांचे स्वॅब घेणे व त्यांना क्वांरटाईन ठेवणे आदी प्रक्रिया आरोग्य विभागाद्वारे होत आहे. साथरोग कक्षाला प्रथम प्रवाशांची यादी प्राप्त होते, त्यानंतर मनपा व ग्रामीण अशी विभागणी करण्यात येऊन त्यांच्या पत्ता व फोन नंबरद्वारे प्रवाशांशी संपर्क केला जात आहे.अद्याप जिल्ह्यात परतलेल्या ५० प्रवाशांसोबत आरोग्य यंत्रणेचा संपर्क झालेला नाही. यात महापालिका क्षेत्रातील ३८ व जिल्हा ग्रामीणमधील १२ जण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये काही प्रवाशांची घरे कुलूपबंद, तर मोबाईल क्रमांक संपर्काबाहेर असल्याने अशा प्रवाशांची माहिती पोलीस आयुक्तांनाही देण्यात आलेली आहे. यामध्ये हायरिस्क देशातील किती प्रवासी आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
‘एस’ जीन शोधण्याची किट तीन दिवसांत विद्यापीठाचे प्रयोगशाळेत ओमायक्रॉनचा संशयित जीन शोधण्यासाठी आवश्यक असलेली किट सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविले जात आहेत. याचे निदान जिल्ह्यातच व्हावे, याकरिता आवश्यक दोन कीट दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठ प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय व्होल जिनोम सिक्वेंसिंगचा प्रस्तावही दोन दिवसात शासनाला सादर होणार असल्याचे ते म्हणाले.