अमरावती : राज्यात आता प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने त्याकरिता पुढाकार घेतला असून येत्या १५ दिवसांत ज्येष्ठ नागरिक कक्ष करून तेथे समस्या, प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन गंभीर असून ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी तात्काळ ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा व येणाऱ्या पंधरा दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे आदेश समाज कल्याण आयुक्त नारनवरे यांनी दिले. पुणे येथे १६ जुलै २०२१ रोजी समाजकल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक उपायुक्तांसमवेत राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन आयुक्त नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली बार्टी येथे करण्यात आले होते.
कोरोना साथरोगाचा समाजातील सर्वच घटकांना फटका बसला आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचेदेखील अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यांच्या सर्व अडीअडचणीचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नारनवरे यांनी यावेळी सूचित केले. जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे लवकरच ना. मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे अमरावती येथील प्रादेशिक उपायुक्त विजय सावळे यांनी स्पष्ट केले आहे.