अमरावती : कृषी समृद्धी प्रकल्पाद्वारे उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत वरूड तालुक्यातील सावंगी (जिचकार) व सुरळी येथील शेतकरी गटांद्वारे १४ टन संत्रा पुणे बाजार समितीला पाठविण्यात आला आहे. कृषी पणन संघाच्या सहकार्यातून या संत्र्याची विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेल्या गाळ्यावर थेट विक्री करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे अद्वितीय चव असणारी रसाळ नागपुरी संत्री ४० रूपये किलोप्रमाणे विकली जात आहेत. विभागीय कार्यालयातील कृषी समृद्धी प्रकल्पाद्वारे वरूडची संत्री पुण्यात पाठवण्यात येऊन उत्पादक ते ग्राहक या उपक्रमाद्वारे थेट विक्री करण्यात येत आहे. या उपक्रमाला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त तथा प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखविली. संत गजानन महाराज संत्रा उत्पादक गट, सुरूळी व यशवंत बाबा संत्रा उत्पादक गट सावंगी या शेतकरी गटांनी पणन मंडळाच्या सहकार्याने संत्राचे ट्रक पुण्यात पाठविले आहे. पुणे पणन मंडळानेदेखील बाजार समिती परिसरात विनामूल्य गाळे उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी संत्रा उत्पादक संघाचे उपाध्यक्ष रमेश जिचकार,घनश्याम भोपती, नंदकिशोर जिचकार, योगेश गावंडे उपस्थित होते. आॅक्टोबर महिन्यात संत्र्याचा हंगाम जोमाने सुरू झाला. वरूड, नरखेड, काटोल, चांदूरबाजार, कळमेश्वर, नागपूर आदी बाजारपेठेमध्ये साधारणपणे २५ ट्रकची आवक सुरू असताना प्रती टनाचा भाव २० ते २२ हजार रूपये (एक टन = ७००० फळे) होता. आता आणखीही आवक वाढली आहे. दररोज ५० ट्रकची आवक होत आहे व संत्र्यांचा भाव १२ हजार रूपये प्रती टन एवढा घटला आहे. भाव पडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुस्कील झाले आहे. थंडीमुळे दिल्लीत संत्राची मागणी कमी झाली. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम सुरू झाल्याने पुणेकरांना रसाळ नागपुरी संत्री मिळत आहेत. (प्रतिनिधी)
आता नागपुरी संत्र्यांची पुण्यात थेट विक्री
By admin | Updated: December 13, 2014 22:30 IST