फोटो - विद्यार्थ्यांचा टाकणे
दहावीचे विद्यार्थी, पालक चिंतातुर, कागदावर चालणारी बोटे वर्षभर इलेक्ट्रॉनिक गजेटवर
अमित कांडलकर-
गुरुकुंज (मोझरी) : ऑनलाइन शिक्षणाच्या गंगाजळीने ऑफलाईन शिक्षणाच्या शिस्तबद्ध संस्कारमय पद्धतीत अचानक कोरोना संकटाचा आडोसा घेऊन बदल झाला. जणू धुडगूसच घातला आणि कागदावर चालणारी बोटे इलेक्ट्रॉनिक गजेटवर धावू लागली. आता ऐन परीक्षेच्या काळात आता हस्तलेखनाचे सामर्थ्य टिकविण्याचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
वर्षभरापासून निव्वळ ऑनलाईन अभ्यासाची गंगाजळी सुरू आहे. त्यात ऑफलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला असून, त्या माध्यमातून येणारा सुसंस्कार हद्दपार झाला आहे. शाळा-महाविद्यालयात निव्वळच शिक्षण मिळत होते का? याचे उत्तर नाही असेच आहे. त्याशिवाय सुसंस्कृतेचे संस्कार सोबतीला असायचे. गेल्या वर्षभरात त्याचा प्रवाह आटला आहे. ज्या वयात फक्त पुस्तकांशी मैत्री हवी, त्या वयात तंत्रज्ञान हाताळावे लागत आहे. त्याचे परिणाम पुढील अनेक वर्षे दिसतील. सातत्याने ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनमध्ये प्रचंड चिडचिड वाढीस लागली असून, नातेसंबंधांवर त्याचे परिणाम अधोरेखित होत आहेत.
दहाव्या व बाराव्या वर्गाच्या परीक्षाचे बिगूल वाजले आणि आतापर्यंत कोरोना संकटाने जेरीस आलेली शालेय यंत्रणा अप्रत्यक्ष येणाऱ्या संकटाची चाचपणी करू लागली. त्यात सर्वात मोठे संकट वर्षभरातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची उत्तरे तीन तासात हस्तलेखनाच्या माध्यमातून उत्तरपत्रिकेवर लिहावे लागतील आणि ते पूर्णतः किती विद्यार्थ्यांना साध्य होईल, याचा विचार सुरू झाला आहे. त्यासाठी आतापासूनच संभाव्य प्लानिंग सुरू झाले आहे आणि सचोटीच्या माध्यमातून शिक्षक त्यावर तोडगा काढतील, हे निश्चित. पण, सदासर्वकाळ घरातच सोबत असलेल्या पालकांनी अशा निसर्गनिर्मित आपत्तीच्या काळात आपल्या पाल्याकडून लिखाणाचे अधिकाधिक कार्य करून घेणे आजची गरज आहे. तेव्हाच आपला पाल्य अधिक्षमपणे परीक्षेचा सामना करू शकेल.