दर्यापूर : शहरातील मालमत्ताधारकांंकडून करवसुलीसाठी १ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नगर पालिका प्रशासनाने एकूण १० प्रभागांत प्रत्येकी २ कर्मचारी यासाठी नियुक्त केले असून, संबंधित मालमत्ताधारकांकडील थकीत व चालू कराची वसुली केली जात आहे. दरम्यान मोठे थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ज्यांंच्याकडे मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्या वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून ३१० मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीसही बजावलेली आहे.
नगर पालिका क्षेत्रातील सर्वच घटकातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीसुद्धा थकबाकीदार कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी शहरातील विविध विकास करण्यास पालिकेला अडचणी येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान मार्च एंडींगच्या तोंडावर नगर पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कराची शंभर टक्के वसुलीचे निर्देश नगर विकास मंत्रालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, कर्मचारी थकीत मालमत्ताधारकांंकडे जाऊन वसुली करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे थकीत मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.
३ कोटी थकित
शहरातील मालमत्ताधारकांकडे ३ कोटी ३४ लाख २७ हजार ८०८ रुपये कराची रक्कम थकीत आहे. यापैकी १ कोटी २५ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. २ कोटी ९ लाख २७ हजार ८०८ रुपये वसूल करणे बाकी आहे. वसुली मोहिमेंतर्गत मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कराचा भरणा करण्याबाबत मालमत्ताधारकांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.