अमरावती : येथील विभागीय क्रीडा संकुलातील मैदानी व इनडोअर स्टेडियमवर कोरोना संक्रमणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश बंद (नो एन्टी) करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा व विभागीय क्रिडा कार्यालयाने विभागीय क्रीडा संकुलातील मैदानी व इनडोअर स्टेडियम २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नोटीस प्रवेशद्वारावर लावली आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी स्टेडियमवर प्रवेश बंद करण्यात आल्याने दररोज सकाळी कसरतीसाठी येणा०या युवकांनी त्या नोटीसपुढे व्यायाम केला. जॉगिंगसाठी येणारे मात्र आल्यापावली परतले.