हल्ला प्रकरण : सूचना मिळताच नेले इस्पितळात अंजनगांव सुर्जी : येथील बहुचर्चित दीपक लढ्ढा यांचेवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी आज जरी पोलीस चौकशीत शेजारीपाजारी पुढे येत नसले तरी घटनेच्या रात्री मात्र लढ्ढा यांनी प्रसंगावधान राखुन केलेल्या मोबाईल कॉलला तातडीने प्रतिसाद देवून त्यांच्या दुकानाचे वयोवृध्द व्यवस्थापक दादाराव बोबडे, राजू देशकर आणि योगेश गीरी या शेजाऱ्यांनीच धाडसाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर अमरावती येथे दाखल केले. हल्ला झाल्यावर दीपक लढ्ढा मरणासन्न अवस्थेत त्यांच्या घरातील अंगणात पडले होते. त्याही अवस्थेत त्यांनी मोबाईल करुन बोडे यांना, काका मला चोरांनी खुप मारले, माझे प्राण वाचवा अशी विनंती केली. त्यानंतर नजिकच्या रस्त्यावरुन शेतात जात असलेल्या निमखेड बाजार येथील विपीन मनोहर अनोकार यांनी सुध्दा आपली दुचाकी थांबवून लढ्ढा यांना रुग्णालायत नेण्यास मदत केली. दुकान व्यवस्थापक बोबडे व शेजारचे देशकर आणि गीरी यांच्या कथनानुसार या घटनेच्या निमित्ताने दीपकच्या चारीत्रावर कितीही आरोप होत असले तरी लढ्ढा अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. त्यांनी दोन तास पूजा केल्या शिवाय कधीही व्यवसायाची सुरुवात केली नाही. या दोन तासात कितीही मोठे ग्राहक आले तरी ते पुजेतून उठत नाहीत. ते गर्भश्रीमंत आहेत व व्यवसायातील कमाई हा त्यांचा दुय्यम उद्देश आहे. लहान मुलांना आपल्या घराचे अंगण खेळण्यासाठी मोकळे करुन देणारा व त्यांच्या सोबत प्रसंगी खेळणारा निर्मळ मनाचा दीपक सध्या विविध आरोपांना समोरे जात असला तरी मानवता त्याच्या हृदयात ठासून भरली आहे. त्याच्या चारित्रावर शिंतोडे उडाले, ही दुर्दैवी बाब आहे. दीपक व त्याच्या सोबतची तरुणी आपल्यासमोर कधीही वावरली नाही, असे शेजाऱ्यांनी आवर्जून नमुद केले. दीपक सध्या इस्पितळात गंभीर अवस्थेत असला तरी त्याने शेजाऱ्यांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
शेजाऱ्यांनीच वाचविले दीपक लढ्ढांचे प्राण
By admin | Updated: July 16, 2015 00:35 IST