रेल्वे स्थानकाजवळील घटना : जखमी आरोपी इर्विनमध्ये दाखलअमरावती : एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकाला मुलीच्या नातेवाईकांनी बदडले. ही घटना शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकाजवळ रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वसीम अन्वर मोहम्मद मुस्ताक (२०, रा. अन्सार नगर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील एक १४ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत जात असताना आरोपी वसीम नेहमीच तीचा पाठलाग करायचा. दररोज तो तिची छेड काढत होता. शाळेबाहेर उभे राहून हा ‘सडक सख्याहरी’ पीडित विद्यार्थिनीची प्रतीक्षा करीत होता. यामुळे विद्यार्थिनी कंटाळली होती. रविवारी ही मुलगी मैत्रिणीसमवेत शिकवणीला गेली होती. तेथून घरी परतताना आरोपी वसिम दुचाकी एमएच २७- ए.वाय.-३३१३ घेऊन रेल्वे स्थानक चौकाजवळ उभा होता. त्याने पुन्हा मुलीला अडवून तिची छेड काढली. मुलीने याबाबतची माहिती तत्काळ कुटुंबीयांना दूरध्वनीवर दिली. कुटुंबातील काही सदस्य तत्क्षण तेथे पोहोचले आणि आरोपी वसीमला पकडून त्यांनी बेदम चोप दिला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. आरोपी वसिम जखमी असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वसिम अनवर मोहम्मद मुस्ताकविरुध्द भादंविच्या कलम २५४ (ड), (१) पोस्को-१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बालिकेची छेड काढणाऱ्या ‘सख्याहरी’ला नातलगांनी बदडले
By admin | Updated: September 14, 2015 00:06 IST