पर्यटकांची गर्दी : जैन भाविकांचे श्रद्धास्थान, हिरव्याकंच वनराईचे आकर्षणसुरेश सवळे - चांदूर बाजारजैनधर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखर मेंढागिरी सध्या नैसर्गिक सौंदर्याने बहरले आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत नैसर्र्गिक सौंदर्याची मुक्तागिरीवर मुक्तपणे उधळण सुुरु आहे. त्यामुळे येथे भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढते आहे. चहुबाजुंनी ऊंच पर्वताच्या रांगा, दाट सावली देणारी झाडे, हिरव्यागार वेली, त्यावर रंगबिरंगी फुले, जवळच नागासारखी वळणे घेत वाहणारी नाग नदी, तिचे ऊंचावरुन कोेसळणारे पाणी, अंगावर उडणारे तुषार, दुधासारखे फेसळणारे पाणी अशा या मनमोहक दृष्याने जैन बांधवांसह अन्य पर्यटकही सुखावले आहेत. याठिकाणी साडेतीन कोटी मुनिराजांना मुक्ती मिळाली. मुनिश्वर व महान साधकांना येथे मोक्षप्राप्ती झाल्यामुळे मुक्तागिरी हे सिद्धक्षेत्र ठरले आहे. याचा मेंढागिरी म्हणूनही उल्लेख केला जातो. या तीर्थक्षेत्रात एकूण ५२ मंदिरे आहेत. त्यातील काही अतिप्राचिन, तर काही १६ व्या शतकातील आहेत. जवळपास ३०० फूट उंच पहाडावर असलेल्या या ५२ मंदिरांपैकी दहाव्या क्रमांकाच्या मंदिराला अकृत्रिम चैत्यालय असे म्हटले जाते. या चैत्यालयात ७२ जिनबिंब विराजमान आहेत. या मंदिराची निर्मिती एलिचपुरच्या इल राजाने केली आहे. या मंदिर परिसरात आजही अष्टमी व पौर्णिमेला केशर (चंदनाची) वर्षा होते. एक हजार वर्षांंपूर्वीची सप्तफणमंडित भगवान पार्श्वनाथाची मूर्ती येथे असून ती मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. ४० व्या क्रमांकाचे मंदिर तर पर्वताच्या गर्भाशयात खोदले आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या या मंदिराचे स्तंभ व छताची रचना आकर्षक आहे. या मंदिराला लागूनच जवळपास २५० फूट ऊंचीवरुन नाग निर्माण झालेला आहे. ती पाण्याची धार आणि धबधबा जैन बांधवांसोबतच अन्य पर्यटकांनाही स्वत:कडे आकर्षित करतो. जैन धर्म परंपरेनुसार तीर्थक्षेत्राचे दोन प्रकार पडतात. मोक्षप्राप्ती झालेल्या ठिकाणाला सिद्धक्षेत्र तर चमत्कारिक ठिकाणाला अतिशय क्षेत्र म्हटले जाते. मुक्तागिरी हे सिद्धक्षेत्र असले तरी त्या ठिकाणी अनेक चमत्कार दृष्टीस पडतात. त्यामुळे त्याची गणना अतिशय क्षेत्रात ही होते. चांदूरबाजार शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील मेंढागिरीवरील मनमोहक दृश्य व मंदिरातील दर्शनीय अशा प्राचिन, अतिप्राचिन प्रतिमा पाहण्याकरिता पर्यटकाला २५० पायऱ्या चढाव्या लागतात. तर ३५० पायऱ्या उतराव्या लागतात. या सिद्धक्षेत्राला एक वंदना पूर्ण करण्याकरिता एकूण ६०० पायऱ्या पायाखालून घालाव्या लागतात. दक्षिण भारताचे शिखराजी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या मुक्तागिरी (मेंढागिरी) या सिद्धक्षेत्राचे व्यवस्थापन शेकडो वर्षे धर्मपीठाकडे होते. इतिहास प्रसिद्ध भट्टारक पद्मनंदी स्वामीजी त्या दरम्यान धर्मपीठाचे पीठाधीश होते.
निसर्ग सौंदर्याने बहरले मुक्तागिरी
By admin | Updated: August 20, 2014 23:14 IST