हिस्ट्रीशिटर नानीका हसनची भरदिवसा हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:43+5:30

मृत शेख हसन शेख हुसैन याची गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असून, तो नानीका हसन या नावाने परिचित होता. सोमवारी शेख हसन हा एका गुन्ह्यातील तारखेवर न्यायालयात जात असताना त्याने सुभाष लालनजी खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) याला इर्विन चौकातून सोबत घेतले. त्यानंतर दोघेही एमएच २७ एजे ९५५७ क्रमांकाच्या मोपेडने न्यायालयात पोहोचले.

Nandika Hassan assassinated historian | हिस्ट्रीशिटर नानीका हसनची भरदिवसा हत्या

हिस्ट्रीशिटर नानीका हसनची भरदिवसा हत्या

Next
ठळक मुद्देजाफरजीन प्लॉट परिसरात खळबळजनक घटना : मिरची पूड डोळ्यात फेकून धारदार शस्त्रांनी केले वार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील आझादनगर येथील रहिवासी शेख हसन ऊर्फ नानीका हसन (४७) याची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. जाफरजीन प्लॉट परिसरात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. हल्लेखोरांनी मिरची पूड डोळ्यात फेकून शेख हसनवर धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर पलायन केले. पोलिसांनी अवघ्या तासभरात सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
मृत शेख हसन शेख हुसैन याची गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असून, तो नानीका हसन या नावाने परिचित होता. सोमवारी शेख हसन हा एका गुन्ह्यातील तारखेवर न्यायालयात जात असताना त्याने सुभाष लालनजी खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) याला इर्विन चौकातून सोबत घेतले. त्यानंतर दोघेही एमएच २७ एजे ९५५७ क्रमांकाच्या मोपेडने न्यायालयात पोहोचले. तारीख घेऊन शेख हसन साथीदार सुभाषसोबत जाफरजीन प्लॉट मार्गाने जात होते. यादरम्यान दुचाकी व ऑटोरिक्षाने पाठलाग करीत पोहोचलेल्या सहा हल्लेखोरांनी शेख हसनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यामुळे शेख हसनसह सुभाष दोघेही रस्त्यावर कोसळले. त्याचक्षणी सहा हल्लेखोरांनी शेख हसनवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. शेख हसनवर हल्ला झाल्याचे पाहून सुभाष खुरखुरैया घटनास्थळापासून दूर गेले. हल्लेखोरांनी शेख हसनच्या चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी झाले. त्यानंतर ते पसार झाले. शेख हसन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होता. या घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शेख हसनला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी शेख हसनला मृत घोषित केले. शेख हसनची हत्या झाल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरल्याने नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. इर्विनच्या ओपीडी कक्षात प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा ताफा रुग्णालयात पोहोचला. गोंधळाची स्थिती पाहून शेख हसनचा मृतदेह तत्काळ शवविच्छेदनगृहात हलविण्यात आला. त्यानंतर रुग्णालय परिसर व बाहेरील परिसरात जमलेल्या नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले. या घटनेमुळे मुस्लिम परिसरात शहरात प्रचंड खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी शेख हसनची पत्नी जरीना बानो शेख हसन (४०, रा. आझादनगर) यांच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अलीमनगर परिसरातील एका वाडीतून अटक केली. पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, उपनिरीक्षक गजानन राजमलू, कर्मचारी अ. कलाम अ. कदीर, मनीष सावरकर, गजानन ढेवले, सागर ठाकरे, अमोल यादव विनोद मालवे यांनी ही कारवाई केली.

कोतवाली हद्दीत तीन हत्येच्या घटना
शहरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, १५ दिवसांत जाफरजीन प्लॉट परिसरात हत्येच्या दोन घटना घडल्या. तत्पूर्वी, बंबई फैल परिसरात एका महिलेची हत्या झाली होती. चार दिवसांपूर्वी अब्दुल समीर अब्दुल जमीर नामक व्यक्तीची हत्या झाली, तर सोमवारी शेख हसनची निर्घृण हत्या झाली. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इर्विन रुग्णालयाला छावणीचे स्वरुप
इर्विन रुग्णालयापुढील रस्त्यावर नागरिक उभे झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा ताफा पोहोचला.


उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त सुहास भोसले, बळीराम डाखोरे, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा रुग्णालय परिसरात तैनात झाला होता. पोलिसांनी नागरिकांना पांगवून रुग्णालय परिसराबाहेर काढले तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

सल्लू हत्याकांडाचा बदला
काही वर्षांपूर्वी नागपुरी गेट हद्दीत शेख सलीम ऊर्फ सल्लू नामक इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीतील वादातून झालेल्या या हत्याकांडातील मुख्य आरोपी हा शेख हसन होता. सल्लूच्या हत्येचा वचपा काढण्याच्या उद्देशाने सोमवारी त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी शेख हसनला संपविल्याचे कोतवाली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

यापूर्वी एमपीडीए
व तडीपारीची कारवाई
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शेख हसनविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली होती. अनेकदा त्याच्याविरुद्ध प्रतिबंधत्मक कारवाईसुद्धा झालेली आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेख हसनला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने उच्च न्यायालयातून तडीपारीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळविली होती. यासंदर्भात न्यायालयाने पोलिसांना से मागितला होता. त्याबाबत प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.

शेख हसनविरुद्ध
३४ गुन्ह्यांची नोंद

आझादनगरातील नानीका हसन हा गांजाची तस्करी करायचा. त्याचा जुगाराचाही अवैध व्यवसाय होता. त्याच्याविरुद्ध नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत २१, गाडगेनगर ठाण्यात १२ व कोतवालीत एक असे एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत. हत्या, राइट्स, मारहाण, चोरी, प्राणघातक हल्ले, लुटपाट, धमक्या देणे, गांजा विक्री अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.

तासभरात सहा आरोपींना अटक
शेख हसनच्या हत्येनंतर कोतवाली, नागपुरी गेट व गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले. तासभरात नागपुरी गेट व कोतवाली पोलिसांनी आरोपींना गाडगेनगर हद्दीतून अटक केली. शेख इरफान शेख अयूब (३०), शेख वसीम शेख गफ्फार (२५), शेख शाहरूख शेख सलीम ऊर्फ सल्लू (१८), शेख गोलू ऊर्फ रिजवान शेख अयूब (१९), शेख सलमान शेख सलीम (२०, सर्व रा. खुर्र्शीदपुरा) व सै. फैजान ऊर्फ सोनू ऊर्फ छोटा रिचार्ज सै. सफी (१८, रा. ताजनगर नं.२) अशी त्यांची नावे आहेत.

नातेवाईकांचा आक्रोश
आझादनगरात नानीका हसन नावाने प्रचलित असणाऱ्या शेख हसनला चार मुली व दोन मुले आहेत. शेख हसनची हत्या झाल्याचे समजताच त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळींनी इर्विन रुग्णालय गाठले. रक्ताबंबाळ अवस्थेत शेख हसनला पाहून ओपीडी वॉर्डात नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश सुरू झाला.

Web Title: Nandika Hassan assassinated historian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून