अवैध मुरूम खनन धोकादायक : तर केव्हाही खंडित होईल वीज पुरवठाश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरारेल्वे गाड्यांना २५ हजार व्होल्टचा वीजपुरवठा करणाऱ्या बडनेऱ्यातील ‘कर्षण’ उपकेंद्राच्या पायथ्याशी मुरूम चोरट्यांनी अवैध खनन केल्याने या उपकेंद्राचे टॉवर केव्हाही कोसळू शकतो. असे झाल्यास रेल्वेचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, अशी स्थिती आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासनासह महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.अंजनगाव बारी नजीकच्या एक्सप्रेस हायवेलगत मध्य रेल्वेचे २२०/२५ के. व्ही. कर्षण उपकेंद्र बडनेरात आहे. हे उपकेंद्र पूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येत होते. सन २०१४ पासून हे उपकेंद्र भुसावळ विभागात समाविष्ट करण्यात आले. या उपकेंद्रात पुरेसे मनुष्यबळ नाही. त्याचे कार्यान्वयन भुसावळ येथून होत असते. रेल्वे गाड्यांना वीजपुरवठा पुरविण्याचे काम वीज उपकेंद्रातून होत असते. रेल्वेचा वीजपुरवठा बंद राहू नये व रेल्वेगाड्या थांबू नये, यासाठी मध्य रेल्वेचे ठिकठिकाणी स्वतंत्र वीजपुरवठा पुरविणारे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या पायथ्यापर्यंत मुरूम चोरट्यांनी अवैध खनन केले आहे. त्यामुळे वीज वाहक टॉवर्स खिळखिळे झाले आहेत. मुरुमचोरट्यांनी सरकारी जागेत अवैध खनन करून मोठे खड्डे तयार केले आहे. महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कानाडोळा केल्यास रेल्वेचा वीजपुरवठा अचानक थांबू शकतो व यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होऊ शकते, असे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. महसूल विभागासह रेल्वेचे संबंधित अधिकारीदेखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मुरुम चोरटे राजरोसपणे मुरुम चोरून लाखो रुपयांचा चुना महसूल विभागाला लावत आहेत.या गंभीर प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्राजवळ अशाच पद्धतीने खनन होत राहिल्यास मोठा अपघात नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. अवैध खनन करणाऱ्यांवर वेळेच्या आत कठोरपणे कारवाईचा बडगा उभारणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी तसेच मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधकांनीच याकडे लक्ष पुरविले पाहीजे, अशा प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
रेल्वे वीज केंद्राचे टॉवर खिळखिळे
By admin | Updated: March 10, 2017 00:25 IST