अमरावती : स्थानिक गोपालनगर परिसरात उधारीच्या पैशांवरून उद्भवलेल्या वादातून पाणीपुरी विक्रेत्याची हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. वीरु अलगू प्रजापती (२१, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश ह. मु.महावीरनगर) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी शुभम सोनोने (रा.कृषीनगर) नामक युवकाला अटक केली आहे. पोलीस चौकशी दरम्यान आरोपी शुभमने तीन घरफोड्यांची कबुलीसुध्दा दिली आहे. उत्तर प्रदेशातून अनेक जण अमरावतीमध्ये व्यवसाय करण्याकरिता येतात. याच उद्देशाने वीरु प्रजापती हा युवक अमरावती शहरात दोन ते तीन वर्षांपासून पाणीपुरीचा व्यवसाय करीत आहे. गुरूवारी सायंकाळी वीरू गाडी बंद ठेवून शहरात फिरत होता. रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना त्याची आरोपी शुभम सोनोने याच्याशी गोपालनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर भेट झाली. शुभम् सोनोनेकडे असलेल्या उधारीसाठी वीरूने त्याला हटकले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातूनच शुभमने वीरू प्रजापतीवर चाकूने हल्ला केला. वीरूच्या छातीवर दुखापत झाली. यात हल्ल्यात वीरू गंभीररीत्या जखमी झाला. अधिक रक्तस्त्रावामुळे वीरू प्रजापतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
गोपालनगरात पाणीपुरी विक्रेत्याची हत्या
By admin | Updated: July 12, 2014 00:36 IST