पान ४
कुख्यात कपिल भाटीवर ‘एमपीडीए’ : राजापेठ ठाण्यातील यंदाची दुसरी कारवाई
अमरावती : शहर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढविला असून, जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान राजापेठ पोलिसांनी दोघांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई केली आहे.
२६ ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार कपील रमेश भाटी, (२४, रा. बेलपुरा) याच्यावर कलम ३ (२) एमपीडीए कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. त्यास पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या आदेशान्वये शुक्रवारीच अमरावती कारागृहात दाखल करण्यात आले. भाटीविरूद्ध खंडणी, मारहाण, वाटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहे. त्याला पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आले. मात्र यंदा त्याने तब्बल सहादा तडीपारीचे आदेश डावलले. तो या काळात सहावेळा शहरात फिरताना आढळून आला. सबब, त्याचेविरूद्ध एमपीडीए लावण्यात आला. विशेष म्हणजे राजापेठ पोलिसांनी एप्रिल महिन्यात विक्रम किशोरसिंग ठाकूर उर्फ सलिम (सातुर्णा) याच्याविरूद्ध देखील एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठविले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र शेंडे, राजेश गुरेले, पवन घोंम, सुनिल ढवळे, दुलाराम देवकर, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, दानिश शेख यांनी केली.