अमरावती : जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचा नवीन डाव आता सुरू झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी खाते वाटपासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांसमोर विकास कामांच्या आव्हानांचा डोंगर असणार आहे. सिंचन, बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य, कृषी विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर आदींची नवीन टीम मिनी मंत्रालयाचे कामकाज सांभाळणार आहेत. काँग्रेस आणि वऱ्हाड विकास मंच यांच्यात आघाडी यांच्यातून तयार झालेली ही टीम पुढील अडीच वर्षांसाठी कार्यरत राहील. मागील अडीच वर्षांत सिंचन विभागातील कामे, बांधकाम विभागातील कामे आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला जनसुविधेचा निधी, १३ वा वित्त आयोग असा कोट्यावधींचा काही सदस्यांनी परस्पर नेला. त्यामुळे बहुतांश सदस्य कामापासून वंचित आहेत. तशीच परिस्थिती शिक्षण विभागाच्या वर्गखोल्याच्या बांधकामाबाबतही आहे. आरोग्य विभागाला प्राप्त निधी नियोजनाअभावी अखर्चित पडून आहे. समाजकल्याण विभागातही कोट्यवधींचा निधी अखर्चीत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांसमोर या अडचणी सोडविण्याचे आव्हान असणार आहे. केंद्र आणि राज्यात झालेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. मागील अडीच वर्षांत राज्यात आणि केंद्रात आघाडीचे सरकार होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला होता. यावेळची परिस्थिती मात्र अवघड असणार आहे.मागील वेळी योजनापासून वंचित ठेवल्याबद्दल काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. आता पुढील अडीच वर्षांत सर्वपक्षीय सदस्यांना सोबत ठेवून विकास करण्याचे कौशल्य साधावे लागणार आहे, हे विशेष. (प्रतिनिधी)
नव्या पदाधिकाऱ्यांपुढे आव्हानांचा डोंगर
By admin | Updated: November 3, 2014 23:18 IST