लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आई, बाबा, पिंकीताई मला माफ करा, दोन्ही घटनांना मीच जबाबदार आहे, मी तुमचा गुन्हेगार आहे, अशी तीन वाक्यांची सुसाइड नोट लिहून अमोलने स्वतःलाही संपविले. पत्नी शिल्पा ही मरण पावल्याची खात्री केल्यानंतर तो फासावर झुलला. अन् सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या त्या दाम्पत्याचा शेवट झाला.
पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत, तर पत्नीचा मृतदेह बेडवर पडून असल्याचा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता प्रज्ज्वल पाथरे यांच्या रहाटगावस्थित शेतातील घरात उघडकीस आला. अमोल सुरेश गायकवाड (३५) व शिल्पा अमोल गायकवाड (३२), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. आर्य समाज मंदिरात सात महिन्यांपूर्वी शिल्पा हिच्याशी विवाहबद्ध झालेल्या अमोलने टोकाचे पाऊल का उचलले, ते कारण अद्याप पुढे आले नाही. घटनेला आर्थिक चणचण व दारूच्या व्यसनाची किनार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
शिल्पा लग्नाआधी राहत होती भावाकडेरामगाव येथे भावाकडे राहणाऱ्या शिल्पाला आई-वडील नव्हते, अशी माहिती पोलिस चौकशीदरम्यान समोर आली आहे. अमोलचा लहान भाऊ मंगेश गायकवाड हादेखील रहाटगाव भागातच राहत होता. भाऊ व भावजयचे मृतदेह वाडीतील घरात आढळल्याचे समजताच त्याने तिकडे धाव घेतली. बहीण विवाहित असल्याचे समजते. शिल्पाचा मृतदेह तिच्या माहेरकडच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी केली.
भाड्याचे किराणा दुकान चालवत होतामूळचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाठोडा व सध्या रहाटगाव येथील पाथरे यांच्या फॉर्महाऊसमध्ये राहणारा अमोल गायकवाड व नांदगावपेठ नजीकच्या रामगाव येथील शिल्पा सिरसाट यांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. तो रहाटगाव रिंगरोड भागातील एका संकुलातील भाड्याच्या खोलीत किराणा दुकान चालवित होता, तर शिल्पादेखील खासगी नोकरी करीत होती. अमोल यापूर्वी मार्केटिंग करीत होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
डीसीपी, एसीपी पोहोचलेनांदगाव पेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलादेखील पाचारण करण्यात आले. पोलिस उपायुक्त सागर पाटील, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलास पुंडकर हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे दुपारी दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, अहवाल अप्राप्त असल्याने पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
"पती-पत्नीचा मृतदेह ते राहत असलेल्या घरात आढळले. पीएम रिपोर्ट आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होईल. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे."- कैलास पुंडकर, एसीपी, फ्रेजरपुरा.