लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/मोर्शी : मोर्शी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या दुचाकीस्वार मॅनेजरला १२.३९ लाख रुपयांनी लुटण्यात आले होते. त्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्या मायक्रोफायनान्स कंपनीच्या 'आजी-माजी' कर्मचाऱ्यांनीच लुटीचा तो प्लॅन रचल्याची माहिती उघड झाली आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका विधिसंघर्षित बालकाचादेखील समावेश आहे. अटक सहा आरोपींकडून रोख १ लाख, गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, चार मोबाइल असा एकूण ५.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एसपी विशाल आनंद यांनी सोमवारी दिली.
२५ जून रोजी क्रेडिट अॅक्सेस मायक्रो फायनान्सचे मॅनेजर शुभम मस्के हे मित्र शालिकराम धिकार यांच्यासमवेत वसुलीची रक्कम मोर्शीतील एसबीआय येथे घेऊन जात असताना ट्रिपलसिट बाईकस्वारांनी त्यांना कट मारून खाली पाडले तथा ते १२ लाख ३९ हजार ६३९ रुपये असलेली बॅग हिसकावून पळून गेले होते. या जबरी चोरीप्रकरणी शेख समीर ऊर्फ सोनू (वय २२), शेख साहिल ऊर्फ मोनू (२४), यश ऊर्फ आरू टेकाडे (२३), विशाल ऊर्फ वंश खत्री (२१, चौघेही रा. नरखेड), तौसीफ खाँ (२२, रा. येरला, मोर्शी) व तनीश ऊर्फ क्रिष्णा ऊर्फ गोट्या धनंजय पेंदाम (२१, रा. रामनगर नागपूर) यांना अटक करण्यात आली.
शेख समीर मुख्य सूत्रधारयातील शेख समीर हा या लुटीचा मुख्य सूत्रधार आहे. तो वर्षभरापूर्वी त्या फायनान्समध्ये कामाला होता. तर तेथे आता कार्यरत असलेला तौसिफ खाँ हा त्याचा मित्र आहे. त्या दोघांनी तो कट रचला. पीएसआय सागर हटवार यांनी चार आरोपींना मोर्शी तालुक्यातील मायवाडी फाट्याहून दुचाकी व चारचाकीसह ताब्यात घेतले होते. एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
अशी लुटली रक्कमप्लॅननुसार २५ जून रोजी दुपारी सोनू, मोनू, आरु व बालक असे कारमध्ये व वंश व गोट्या हे दोघे आरुच्या दुचाकीने नागपूरहून मोर्शीला आले. वंश, गोट्या व बालक हे फायनान्स कार्यालयाच्या आजूबाजूस रेकीसाठी थांबले. दुपारी अडीचच्या सुमारास दोघे पैशांची बॅग घेऊन निघाले असता त्या तिघांनी त्यांना अडवून पैशाची बॅग हिसकली. सुसाट वेगाने मोर्शीबाहेर थांबलेल्या कारजवळ पोहचले. तेथून ते सर्व नागपूर येथे वंशच्या प्लॉटवर पोहचले. हिस्सेवाटणीनुसार सोनू, वंश, गोट्या आणि विधिसंघर्षित बालकाने प्रत्येकी ३ लाख रुपये घेतले. आरुला २० हजार रुपये दिले.