गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे. यात सुमारे १५०० हेक्टर वनक्षेत्र जळून राख झाले असून, यात पूर्व मेळघाट वनविभागाच्या काही वनक्षेत्रांचा समावेश आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर २०२९.०६ चौरस कि.मी. क्षेत्रफळ इतका आहे. सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागाचा समावेश आहे. यात १५०० हेक्टर कोअर, १२६८ हेक्टर बफर झोन आणि १९० हेक्टर परिसरात पर्यटनक्षेत्राचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वनक्षेत्रात लागलेल्या वणव्याने कोकटू, कोहा, कुंड, तारूबांदा, ढाकणा, रायपूर, सेमाडोह, धारगड, गोलई, सोमठाणा, डोलार, मालूदा, अढाव आदी कोअर क्षेत्रातील जंगल जळून राख झाले. चिखलदरा, जारीदा, नरनाळा, अकोट, हरिसाल, चौराकुंड, वाण व अन्य बफर झोनचे वनक्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. या वणव्यात किती वन्यजिवांचा होरपळून मृत्यू झाला, ही आकडेवारी गुलदस्त्यात आहे. वनवणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपयायोजना करण्याचे शासन आदेश असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे याबाबत पूर्णत: नियंत्रण ढासळले आहे. मेळघाटच्या वनक्षेत्रात आगीमुळे दुर्मीळ वनौषधी, सागवानासह अन्य वृक्षांची मोठी हानी झाली आहे. मात्र, या वणव्यांकडे वरिष्ठ वनअधिकारी ‘रूटीन’ आग म्हणून बघत असून, लाखो रुपयांची वनसंपदा आणि वन्यजिवांच्या मृत्यूबाबत ते अद्यापही बेफिकीर असल्याचे चित्र आहे. वणव्याचा वस्तुनिष्ठ अहवाल आल्यास आयएफएस लॉबी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वणव्याचा विषय गुंडाळण्याची तयारी वनाधिकाऱ्यांनी चालविल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.क्षेत्र संचालकांना ‘एसी केबिन’चा मोहवनक्षेत्राला आग लागल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आगीच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. पंरतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक हे पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात मश्गूल असल्याची माहिती आहे. वातानुकूलित केबिनचा मोह आवरत नसल्याने ते मेळघाटऐवजी अमरावतीत मुख्यालयी ठाण मांडून आहेत. वनकर्मचाऱ्यांना मात्र वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीव मुठीत घेऊन जंगलात राहावे लागत आहे.ब्लोअर मशीन, इंधनाची कमतरतामेळघाटच्या विस्तीर्ण जंगलात वणव्याने मोठ्या वनक्षेत्राची हानी झाली आहे. यात वनाधिकारी कागदी घोडे नाचवित असले तरी आग विझविण्यासाठी ब्लोअर मशीन आणि इंधनाची कमतरता ही गंभीर समस्या आहे. आग विझविणारी उपकरणे वेळीच मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. या वणव्यात वन्यजिवांचीही दमझाक झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वणव्यामध्ये वनक्षेत्र आणि वन्यपशूंचे नुकसान झाल्याबाबत अहवाल मागविला आहे. वस्तुनिष्ठ अहवाल येताच याप्रकरणी कार्यवाही केली जाईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वणव्याने राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:03 IST
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वणव्याने राखरांगोळी
ठळक मुद्देनियंत्रण ढासळले विदर्भात पाच व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक आग