अमरावती : जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २० जानेवारी रोजी होऊ घातली आहे. या सभेत जिल्हा नियोजन समिती सन २०२०-२१ च्या आराखड्यावर चर्चा क़रून निर्णय घेतले जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या सर्व आमसभा ऑनलाईन घेण्यात आल्या. मात्र, बहूप्रतीक्षेनंतर आता झेडपी आमसभा ऑफलाईन पध्दतीने होत आहे. या पहिल्याच सभेत जिल्हा नियोजन समिती आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजनेंतर्गत आगामी वर्षात प्राप्त निधीतून विकासकामांचे प्रस्ताव सदस्यांकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार सदस्यांनी आपापल्या जिल्हा परिषद सर्कलमधील कामांच्या शिफारसी सादर केल्या आहेत. यात रस्ते, शाळा वर्गखोली बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम व अन्य विविध कामांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या बुधवारी होऊ घातलेल्या झेडपी विशेष सभेत विस्तृत चर्चा करून निर्णय घेतले जातील. त्यामुळे या सभेकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.