चिखलदरा : येथील अतिदुर्गम भागातील सलोना गावात निवास करणारी सुग्रती ही एक अपंग महिला. माविमच्या मदतीने तिने गावातील सर्व महिलांमध्ये बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक स्वयंपूर्णत: आणली. अपंगत्वावर मात करून स्वतःचे व सलोनीतील महिलांचे जीवनमान उंचावण्याचा व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला.
अपंगत्व आणि जेमतेम आर्थिक परिस्थितीवर मात करत असताना सुग्रतीची भेट महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) द्वारा स्थापित सिपना लोक संचालित साधन केंद्र, चिखलदरा येथील सहयोगिनी सोबत झाली व आशेचा किरण सुग्रतीच्या दृष्टीस पडला. माविमच्या माध्यमातून सहयोगिनी ताईंच्या मार्गदर्शनात सुग्रतीने खुशी महिला बचत गटाची स्थापना केली. खुशी बचत गटाला प्रथम २० हजार रुपयांचा फिरता निधी मिळाला. या निधीतून तिने गटातील महिलांना एक-एक शेळी खरेदी करून दिली. उत्पन्नाचा लाभ सर्वांना व्हावा यासाठी सर्व शेळ्या वेगवेगळया न ठेवता एकत्र ठेवल्या व त्यामधून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. गटाच्या माध्यमातून होणारे आर्थिक फायदे सुग्रतीच्या लक्षात येऊ लागले. याचीच निष्पत्ती म्हणजे सुग्रतीने गावातील सर्व महिलांना एकत्रित करून माविमच्या सहयोगिनी ताईच्या मार्गदर्शनात गावातील सर्व महिलांचे बचत गट स्थापन केले. आता खऱ्या अर्थाने सलोनी येथील स्त्रियांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू झाली.
चिखलदरा येथे मोहफुले, बांबू, जवस, मध, दूध, जागणी पिकाचे उत्पादन विपुल प्रमाणात होते. या नैसर्गिक संपदांचा उपयोग करून स्थानिक आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे शक्य होते. त्यासाठी गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध करणे आवश्यक होते. हे जाणून स्थानिक महिलांच्या सहभागाने ग्रामोद्योगाची उभारणी करण्यासाठी सुग्रतीचे प्रयत्न सुरू झाले. माविमच्या सहयोगिनी ताईच्या मार्गदर्शनात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सिपना लोक संचालित साधन केंद्र, चिखलदरा येथे ग्रामोद्योगाची उभारणी करण्यात आली आणि पहिल्या महिला बचत गटाची निवडण्यात आले.
या ग्रामोद्योग केंद्राकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत आणि सिपना लोक संचालित साधन केंद्र, चिखलदराच्यावतीने निधी देण्यात आला. मेळघाट ग्राम उद्योग केंद्र सलोना, असे नामकरण करण्यात आले. मेळघाटातील रानमेवा, मोहफुल, जवस, जगनिपासून तेल बनविण्यासाठी ऑईल मील मिळाले. जय महालक्ष्मी गटांतील दहा महिलांना शेवई मशीन, शांती महिला बचत गटातील महिलांना आटाचक्की, पूर्वा महिला बचत गटातील महिलांना पापड मशीन व मिरची कांडप यंत्र देण्यात आले. अशाप्रकारे गटातील सर्व महिलांना मेळघाट ग्राम उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळाला. सुग्रतीच्या नेतृत्वात मेळघाटमधील अतिदुर्गम भागातील महिलांची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली.
आज सलोना या गावातील महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत. बँकेचे व्यवहार, त्यांच्या उद्योग विषयी व्यवहार, मुलांचे शिक्षण, तसेच आरोग्या संबंधीचे सर्व प्रश्न या महिला कुशलतेने हाताळू लागल्या आहेत. आपल्या गटाला झालेल्या बचतीचा विनियोग, व अर्थसहाय्य करण्यास या महिला सक्षम झाल्या आहेत. अवघा चवथा वर्ग शिकलेली सुग्रती इथेच थांबली नाही. गरिबी परिस्थितीमुळे तिला शिक्षण घेणे जमले नाही. पण आपल्या भावंडाना तिने उच्च शिक्षीत केले. बहिणींचे लग्न सुग्रतीने लावून दिले. आपल्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या होण्यासाठी सहा शीलाई मशीन विकत घेऊन गावातील महिलांचे ड्रेस, ब्लाउज व शाळेचा गणवेश शिवायला सुरुवात केली व बहिणींचासुद्धा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली.माविमने तिला आणि मेळघाटातील तिच्यासारख्या असंख्य महिलांना आर्थिक सुबत्ता बहाल केली होती.
कोट १
मेळघाटात महिलांच्या आर्थिक विकासासाठी माविमच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने लोकसंचालीत केंद्राला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. मेळघाटातील महिलांचा बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास होत आहे.
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री
कोट २
चिखलदरा येथील अतिदुर्गम भागातील महिलांनी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू केले. माविम मुळे त्यांचा कौटूबिक स्तर उंचावण्यास मदत झाली असून उद्योग प्रियतेमुळे या ग्रामीण महिलांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. माविम बचतगटाच्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, विकासही घडवून आणण्याची भूमिका बजावत आहे.
- सुनील सोसे, जिल्हा समन्वयक, माविम