अमरावती : अकारण झालेल्या वादात एका तरुणाच्या पोटात चाकूचा वार करण्यात आला. दुसरा वार करण्यासाठी हल्लेखोराने तो चाकू काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चायना चाकूचे पाते पोटातच अडकले आणि मूठ हाती आल्याने हल्लेखोराने पळ काढला. जखमी तरुणाने पोटात चाकू असलेल्या स्थितीतच जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी तत्काळ रुग्णालय गाठले. दुसरीकडे हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले. यावेळी तातडीने शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोटात फसलेले चाकूचे पाते बाहेर काढले.
सै. इरशाद सै. कदीर (३०, आझादनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शहरातील आझादनगर भागात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. नितेश रमेश अडोकार (२४, रा. झाडपीपुरा, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सै. इरशाद व नितेशमध्ये वाद झाला. त्यावेळी नितेशने धारदार चायना चाकू सै. इरशादच्या पोटात खुपसला. दुसरा वार करण्यासाठी चाकू बाहेर काढताना नितेशच्या हातात केवळ मूठ आली. मात्र, चाकूचे सुमारे साडेतीन इंच लांबीचे पाते पोटाच्या आतमध्ये जाऊन अडकले. त्यामुळे नितेशने तेथून पळ काढला.
पोलिसांनी इरशादला रक्तबंबाळ अवस्थेत इर्विनमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून पाते बाहेर काढले तसेच पुढील उपचारासाठी सै. इरशादला नागपूरला रवाना केले असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी नितेश अडोकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.