धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरूड (बगाजी) येथील ॲड. प्रदीप देशमुख (हायकोर्ट नागपूर) यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवास ११८ वर्षे पूर्ण होत आहे. या उत्सवाचे महत्त्व अमरावती जिल्ह्यातील वरूडसह पंचक्रोशीतील व्यक्तींना अनन्यसाधारण आहे.
वरूड येथील प्रगतशील शेतकरी कर्मयोगी दिवंगत बापूराव उर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्त्व समजून १०० वर्षांपूर्वी ज्या गोरगरीब, मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांना पूर्णवेळ जेवळ मिळत नव्हते, अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यात मिष्टान्न भोजनासाठी निमंत्रित करत असे. गावकरी मोठ्या श्रद्धेने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत.
आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र ॲड. प्रदीप देशमुख हे श्रद्धेने आयोजित करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यात महाप्रसादाचे निमंत्रण देतात. या दिवशी गावात अनेक घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम असल्याने कोण्याही घरी वेगळी चूल पेटविली जात नाही. या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्याला देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते.
महालक्ष्मी उत्सवाला ३१ ऑगस्टपासून प्रारंभ होत असून पाच दिवस मानकरी कुटुंबांना जेवणाची मेजवाणी दिली जाते. ही प्रथा ११८ वर्षांपासून आजतागायत देशमुख परिवाराने कायम ठेवली आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा आजही कायम असल्याने दिवाळीचा सण समजून गावकरी देशमुखांकडून महालक्ष्मी उत्सवाला आपल्या विवाहित मुलींना गावी बोलावतात.