सुमित हरकुट - चांदूरबाजारतालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर विद्युत पंप जळत असून या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकरी आधीच भारनियमनाने त्रस्त झाला आहे. आता तर तो मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे. भारनियमनात शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी दररोज सहा तासच वीज पुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस पूर्णत: २४ तास वीज पुरवठा बंद असतो. उर्वरित सहा दिवसांत रोज केवळ सहा तास शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज मिळते. यातील तीन दिवस दिवसा व उर्वरित तीन दिवस रात्री १२ वाजतानंतर वीज पुरवठा होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा दिवसांत फक्त २४ तास वीज मिळते. आठवड्याला मिळणाऱ्या या २४ तास विजेपैकी सर्वदूरपर्यंत चार तास या-ना त्या कारणाने वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २० तासच विद्युत पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. हा वीजपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होतो. या कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांची विहिरीवरील विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. त्यामुळे विद्युत संच जळून जातो. त्यामुळे दुरूस्तीचा पाच ते आठ हजारांचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरीप हंगामातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस व संत्रा पिकावर शेतकऱ्यांच्या थोड्याफार आशा आहेत. परंतु महावितरणने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीनमुळे पार उद्ध्वस्त झालेला शेतकरी रबी पिकाचे नियोजन करीत आहे. अशा वेळी विजेअभावी पाणी मिळत नसल्याने रबीचे पीकही हातचे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रेकडाऊनच्या नावाखाली दिवसा तासन्तास वीजपुरवठा खंडित केला जातो. वीज कंपनीने वेळीच या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
चांदूरमध्ये कमी दाबाचा वीजपुरवठा
By admin | Updated: November 8, 2014 22:31 IST