अमरावती: अमरावती येथील छत्री तलावावर ’मोठी टिबुकली’ या दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन झाल्याने पक्षीमित्रांसह निसर्गप्रेमिंना सुखद धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात हिवाळी पाहुणा म्हणून हा पक्षी अवतरला आहे. बदकाच्या आकाराचा या पक्ष्याला शेपटी नसते. लांब मान, तीक्ष्ण चोचीचा हा पक्षी जलचर आहे. इंग्रजीमध्ये याला ग्रेट क्रेस्टेड ग्रीब असे म्हणतात. तर पोडीकेप्स क्रिस्टासस या शास्त्रीय नावाने हा पक्षी ओळखला जातो. नागपूर वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रात अमरावतीमध्ये पहिल्यांदाच या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. या पक्ष्याला ‘डुबकी’ नावानेही ओळखले जाते.
अमरावतीच्या छत्री तलावात वन्यजीव छायाचित्रकार तुषार अंबाडकर व विनय बढे यांना २८ जानेवारी २०२१ रोजी ‘मोठी टिबुकली’ पक्ष्याने दर्शन देऊन आच्छर्याच्या धक्का दिला. जून ते ऑगस्ट दरम्यान बलुचिस्तान व लडाख भागात वीण करणारा हा पक्षी अमरावती भागात पहिल्यांदाच हिवाळी पाहुणा म्हणून आला आहे. याचा आकार ४५ ते ५० से.मी. पर्यंत असून मासे, बेडूक व पाण्यातील कीटक याचे मुख्य खाद्य आहे. या प्रजाती बद्दल वर्णन पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ लिनॅअस यांनी ई.स. १७५८ मध्ये केले. ‘मोठी टिबुकली’ पक्ष्याने दर्शन अत्यंत दुर्मिळ समजले जाते.
उतर व मध्य भारत, सिंध ते आसाम, मणिपूर आणि कच्छ व उडीसा मध्ये स्थलांतर करनारा हा पक्षी आपल्या मध्य भारतात आल्याचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले. हिवाळी स्थलांतर करणारे पक्षी आता परतीच्या मार्गाला लागले असून पोहऱ्याच्या जंगलालगत छत्री तलाव येथे याचे दुर्मिळ दर्शन झाले आहे. छत्री तलाव व इतर जलीय परिसंस्था अधिवासात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे या पक्ष्यांना धोके निर्माण झाले आहे.
“छत्री तलाव परिसरात ‘मोठी टिबुकली’ पक्ष्याने दर्शन दुर्मिळ आहे. येथे एकूण २३५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंदीसह आजवर अनेक दुर्मिळ पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. छत्री तलाव व पोहरा मालखेड परीसरातील भूस्थित परिसंस्था व जलीय परीसंस्थाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. अनावश्यक विकास प्रकल्प व विकासाचा भस्मासूर या अधिवासांचा कर्दनकाळ ठरतो आहे.”- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
‘मोठी टिबुकली’ पक्ष्याने दर्शन मनाला आनंद देणारे आहे. हिवाळ्यात येणाऱ्या देशी विदेशी पक्ष्यांची छायाचित्रे घेण्यासाठी आम्ही नियमित जात असतो. छत्री तलाव व पर्यायाने पोहरा मालखेड जंगल अतिशय समृद्ध आहे. अमरावतीसाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने छत्री तलाव परिसराचे महत्व लक्षात घेऊन संवर्धन करावे. - तुषार अंबाडकर वन्यजीव छायाचित्रकार, अमरावती