Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:35 PM2019-03-30T13:35:05+5:302019-03-30T13:36:37+5:30

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला.

Lok Sabha Election 2019; The first agricultural minister given the country by Nandgaon Khandeshwar | Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

Next
ठळक मुद्देसर्वाधिक मताधिक्याचा विक्रमविरोधकांना प्रचारस्थळी पोहचवणारे डॉ. पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला. एवढेच नव्हे तर १९५२ व १९५७ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे नोंदविला गेला आहे.
१९५७ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ७६४ मतदान झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १ लाख ५७ हजार ५२३ मते (६२.३२ टक्के) पडली होती. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात इतर पाच उमेदवार होते. यात डॉ. मशानकर यांना २६ हजार ५३१ (१०.४४ टक्के), अण्णा मडघे यांना २० हजार ८९८ (८.२६ टक्के), अडसड यांना २० हजार १४ (७.९१ टक्के), संघई यांना १७ हजार ३७९ (६.८९ टक्के), तर पोतदार यांना १० हजार ४१ (४.१२ टक्के) मते मिळाली होती.
१९६२ ची लोकसभा निवडणूक जिंकून भाऊसाहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला हा नेता दिल्लीच्या राजकारणातही वरचढ होता. १९५२ ते १९५६ या काळात ते भारताचे पहिले कृषिमंत्री व १९५७ ते १९६२ पर्यंत सहकारमंत्री होते. १९६२ च्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न देण्याचा हितशत्रूंचा डावपेच मात्र यशस्वी ठरला. तथापि, पहिल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा विक्रम व डॉ. पंजाबराव देशमुखांचा सामाजिक कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे.

प्रचारासाठी एकच वाहन
प्रचारकार्याचा एवढा तामझाम नव्हता. एकच वाहन प्रचाराला होते. ज्या भागात प्रचार असला, त्या भागातील कार्यकर्ते घेऊन प्रचार सभा घेण्यात येत होती. स्थानिक कार्यकर्तेच प्रचार करीत असत. अलीकडच्या काळात शक्तिप्रदर्शनासारखे काहीही त्यावेळी नव्हते. सभेला माणसे आणली जात नव्हती, तर स्वत:हून लोक येत असत. १९५२ ला देशातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर भाऊसाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या घटनेचे त्यांचे भाचे दिवंगत जानराव देशमुख (सोळंके) हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

विरोधकांना बसविले वाहनात
१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रचारार्थ निघाले असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे वाहन वलगावनजीक पंक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन नियोजित प्रचार सभेला पोहचवून दिले. एवढ्या विशाल हृदयाचा व निर्मळ अंत:करणाचा नेता दुर्मीळच!

पत्नीऐवजी पक्षासाठी मते
१९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, तर त्यांच्या पत्नी विमलाबाई विधानसभेसाठी अपक्ष उभ्या होत्या. दोन्ही निवडणुका त्यावेळी एकत्रच होत असत. भाऊसाहेब पत्नीच्या प्रचारसभेला गेले नाहीत वा त्यांच्यासाठी मतदारांकडे मते मागितल्याचे ऐकिवात नाही; उलट विधानसभेतही काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या, असे ते सांगायचे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The first agricultural minister given the country by Nandgaon Khandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.