अमरावती : लक्षावधी दिव्यांनी निर्माण होणाऱ्या चैतन्याची दिवाळी अर्थात लक्ष्मीपूजन उद्या रविवारी आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी निवडणूक विभागाने विधानसभेचे निकाल जाहीर करून दिवाळीला वाट मोकळी करून दिली आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील विजयी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचवेळी फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळीचा माहौल तयार केला.दिवाळीला २५ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला. अमरावती शहरात या मुहूर्ताला पाऊस होता. त्यामुळे उटणे लावून पहिले अभ्यंगस्नान काहीसे कुरकुरतच अमरावतीकरांनी उरकले. छोट्यांनी मात्र फटाक्यांच्या सज्जतेमुळे पटकन अंघोळ उरकली आणि पटकन बाहेर पळत दोस्तांमध्ये मिसळले. धनत्रयोदशीच्या पर्वावर जिल्हाभरातील सुवर्णकारांकडे काही ना काही सोने-चांदी विकत घेण्यासाठी, दागिना घडविण्यासाठी महिलांची गर्दी पाहावयास मिळाली. सायंकाळी घरोघरी दारांपुढे लावलेल्या लक्षावधी दिव्यांनी अमरावती शहराला चारचांद लावले होते.दरम्यान, निवडणुकीतून बाहेर पडलेले राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. त्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अमरावती शहरात खरेदीसाठी येणाऱ्या कुटुंबांची भर पडली. परिणामी अमरावती शहरातील प्रमुख मार्गांवर खरेदीदारांची जत्रा भरल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे शहरात खरेदीसाठी वाहनाने आलेल्या नागरिकांना, आपली वाहने कुठे पार्क करायची, हेदेखील सुचेनासे झाले होते.फराळाचे साहित्य सज्जलक्ष्मीपूजनाला नैवेद्य दाखविण्यासाठी फराळाच्या विविध पदार्थांची सज्जता गृहिणींकडून झाली आहे. हे पदार्थ घरातील बच्चे कंपनीने त्यापूर्वी शिवू नये, याची खात्री त्यांनी बाळगली आहे. यामध्ये शेव, रव्याचे लाडू, तिळाचे लाडू, पिठी लाडू, चकल्या, करंजी, अनारसे, शंकरपाळी यांच्यासह निरनिराळ्या पदार्थांची यादी आहे. कधी एकदा लक्ष्मीपूजन होते, असे बच्चेकंपनीला झाले आहे.फुले, मूर्ती, फटाक्यांची दुकाने सजलीदिवाळीसाठी झेंडूची फुले, मूर्ती, फटाक्यांची दुकाने अमरावती शहरातील नेहरू मैदान, सायन्स कोअर, सह विविध भागांतील मैदानांवर थाटली आहेत. शहरात पुणे, हैद्राबाद येथून फुले येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.धनत्रयोदशीला दागिन्यांची खरेदीगोतावळा जमलाउच्च शिक्षणानंतर व्यवसाय, रोजगारासाठी अमरावती शहरापासून दुरावलेले कुटुंबीय दिवाळी सणानिमित्त एकत्र आले आहेत. बच्चे कंपनी तर दिवाळीच्या सुट्या लागताच आजी-आजोबांच्या कुशीत विसावले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
चैतन्यदायी दिवाळीला प्रारंभ : बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST