एकीकडे व्यसनमुक्तीचे धडे, दुसरीकडे धूम्रवलये; इर्विनमधील प्रकार, शेकडोंकडून मद्यपान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 12:46 PM2022-11-03T12:46:17+5:302022-11-03T12:52:16+5:30

प्रकार रोखण्याचे सुज्ञ नागरिकांचे आवाहन

lessons on de-addiction at Irwin Hospital, Amravati, drinking by the hundreds of people on the other hand | एकीकडे व्यसनमुक्तीचे धडे, दुसरीकडे धूम्रवलये; इर्विनमधील प्रकार, शेकडोंकडून मद्यपान

एकीकडे व्यसनमुक्तीचे धडे, दुसरीकडे धूम्रवलये; इर्विनमधील प्रकार, शेकडोंकडून मद्यपान

googlenewsNext

अमरावती : व्यसनमुक्तीचे धडे देणाऱ्या व व्यसनाधीनांना त्यापासून मुक्त करण्यासाठी औषधोपचार करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात बुधवारी गांजाची शुभ्र वलये चिलमीतून हवेत सोडली जात होती. शेकडोंचा जमाव मद्यपानातही गुंतला होता. मती गुंग करणारा हा प्रकार येथे वारंवार होत असल्याने त्याला आवर घालावा, अशी सुज्ञ अमरावतीकरांची मागणी आहे.

रुग्णालय परिसरात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेकडो लोक एकत्र आले होते. यावेळी या ठिकाणी काही लोक दारू तसेच गांजाचे सेवन करताना दिसून आले. कैक तास त्यांनी येथेच ठाण मांडले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान तसेच धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून इर्विन रुग्णालय परिसरात खुलेआम गांजा तसेच दारूचे सेवन केले जाते. एकीकडे रुग्णालयात शेकडो रुग्ण व्यसनमुक्तीसाठी तसेच या व्यसनामुळे झालेल्या आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल होतात. दुसरीकडे त्याच रुग्णालय परिसरात खुलेआम दारू व गांजाचे सेवन करताना काही लोक दिसून येत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. बुधवारी रुग्णालय परिसरात या जमावासोबत अनेक महिलाही होत्या.

दोन ते तीन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी रुजू झाल्याने या सर्व प्रकाराची माहिती यापूर्वी नव्हती. परंतु, हा प्रकार रुग्णालय परिसरात चालणे योग्य नसून यासंदर्भात पोलिसांनाही लेखी स्वरूपात कळविण्यात येईल. रुग्णालयाच्या सिक्युरिटी गार्डनाही सूचना देऊन अशा लोकांना रुग्णालय परिसरात प्रवेश नाकारण्याच्या सूचना तत्काळ देऊ.

- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन

Web Title: lessons on de-addiction at Irwin Hospital, Amravati, drinking by the hundreds of people on the other hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.