दिलासा : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाशी करारवरुड : मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा प्रकल्पाशेजारील सिंभोरा आणि नशिरपूर गावातील ६८ भूमिहीन शेतमजुरांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतजमिनीचे पट्टे वाहितीसाठी देण्यात आले आहे.प्रकल्पालगतच्या जमिनीची शेतमजूर वाहिपेरी दरवर्षी करीत होते. मात्र, या वर्षापासून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने संपादित केलेल्या शेतजमीनीचे पट्टे लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात आले. यामुळे भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांवर गंडांतर येणार असल्याने सहा वर्षांपासून शेती कसणारे शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर अन्यायग्रस्त भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे ११ महिन्यांसाठी मिळाले आहेत. प्रकल्पानजिक असलेल्या संपादित जमिनीच्या पट्ट्यात गत सहा वर्षांपासून सिंभोरा आणि नशितपूरचे ६८ भूमिहीन शेतकरी वाहिपेरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. यंदा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने सिंभोरा व नशिरपूर येथील धरणाच्या भिंतीखालील संपादित व सध्या विनावापर असलेल्या शेतजमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता लिलावाची २७ जून ही तारीख ठरविण्यात येऊन बोलीदरांना आमंत्रित केले होते. एकूण ३४ पट्टे प्रत्येकी १.०८ हेक्टर याप्रमाणे एक एक पट्टा लिलाव करणे. असा आदेश काढण्यात आला होता. या निर्णयामुळे सिंभोरा आणि नशितपूर येथील भूमिहीन शेतमजुरांना शेती करण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन कुटुंबावर उपासमारी येण्याची शक्यता होती. सहा वर्षांपासून शेतजमिनीची वाहिपेरी करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यावर अन्याय करणारा प्रकार होता. या संपादित शेतजमिनीचे पट्टे नियमित वाहीपेरी करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना मिळावे म्हणून हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले होते. या मागणीची दखल घेऊन मंत्रालयाने पुनर्विचार करुन अखेर भूमिहीन शेतकऱ्यांना ११ महिन्यांच्या कालावधीकरिता सदर जमिनी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भूमिहीन शेतमजूर रामदास मोंढे, सुरेश राऊत, रामदास नेवारे, श्रीकृष्ण नेवारे, संजय ढोक, ज्ञानेश्वर देवताळे, महादेव ठाकरे, रामदास मडावी, ज्ञानेश्वर राऊत, नामदेव वरठी, अशोक भोयर, रामदास वाघाडे, दुगार् शेळके, विठ्ठल ठाकरे, मधुकर उईके, रंगराव ठाकरे, देविदास ठाकरे, सुनील काळे, विलास भोकरे, विजय सहारे, दादाराव टोम्पे,साहेबराव धुर्वे, भागवत धुर्वे, इंदिरा वरठी, दिवाकर मडावी, हरिश्चंद्र नेहारे, साहेबराव दुधकवरे, गजानन मरस्कोल्हे, रंगराव बोंदरे, बाळासाहेब उमरकर, बाबुराव उमरकर, केवल सुर्यवंशी, तुकाराम खडस यांनी स्वागत केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
भूमिहीन शेतकऱ्यांना मिळाली ११ महिने कालावधीसाठी जमीन
By admin | Updated: June 28, 2014 23:19 IST