जितेंद्र दखणे/अमरावती : जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस पडला. परंतु तब्बल २१ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाची दीर्घ दडी व अगोदरच उशिरा पेरण्या झाल्यामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. परिणामी पिके पूर्णत: कोमेजली आहेत. आधीच उत्पादनात घट येण्याची शक्यता असताना आता पावसाने तब्बल तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाचा खरीप हंगामही हातचा जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाऊस लांबला. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या. त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. जून महिन्यांत पावसाचा पत्ताच नव्हता. परिणामी उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून उडिद, मूगाचे पिक गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनला फटकासोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. त्यातही फुलोराच्या दिवसांत पाऊस गरजेचा आहे. मात्र, ऐन याच कालावधीत पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे.
खरिपातील पिके ‘कोमा’त
By admin | Updated: August 18, 2014 23:14 IST