Kharif collapse; Modified money | खरीप उद्ध्वस्त; सुधारित पैसेवारी ६२
खरीप उद्ध्वस्त; सुधारित पैसेवारी ६२

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : जिल्ह्यात बाधित दीड लाख हेक्टरचे पंचनामे सुरु असताना महसूलचा कुटाराघात

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबरचे दरम्यान अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या दीड लाख हेक्टरमधील पिकांचे सर्वेक्षण अन् पंचनामे सुरू असतानाच खरिपाची सुधारित ६२ पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा ठरला आहे. महसूल यंत्रणेला वास्तवाचे भान नाही काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरला नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर केली. यामध्ये सुधारणेला वाव आहे, असे सांगत ३१ ऑक्टोबरला १९६१ गावांतील सुधारित ६२ पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसाने व अवकाळी पावसाने उद्वस्त होऊनही महसूल यंत्रणेद्वारा, पैसेवारीत शेतकºयांची थट्टा आरंभली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवाती पावसात खंड राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यांपासून आलेल्या पावसाने जिल्ह्याची सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरीत उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आली आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आॅलवेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात असताना ५७ पैसेवारी जाहीर केली आहे. अमरावती तालुक्यात ६२, तिवसा ६३, चांदूर रेल्वे ५८, धामणगाव रेल्वे ६३, नांदगाव खंडेश्वर ५९, मोर्शी ६८, वरूड ७१, अचलपूर ६२, चांदूरबाजार ५९, दर्यापूर ६०, अंजनगाव सुर्जी ६९, धारणी ६० व चिखलदरा तालुक्यात ५४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चदेखील निघणे मुस्किल असताना अंतिम पैसेवारीत तरी जिल्ह्याचे वास्तववादी चित्रण होणार काय, असा सवाल बळीराजाचा आहे.

महसूल यंत्रणेद्वारा शेतकऱ्यांचा विश्वासघात

जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यानच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील खरिपाची पिके ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. ५ नोव्हेंबरच्या आत संयुक्त पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी व महसूल यंत्रणा ३० ऑक्टोबरपासून शिवारात डेरेदाखल झाली. युद्धस्तरावर प्रक्रिया होत असताना हीच महसूल यंत्रणा ३१ ऑक्टोबरला ६२ पैसेवारी दाखवितेच कशी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यामध्ये शेतकºयांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Kharif collapse; Modified money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.