शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:16 PM2020-09-03T22:16:22+5:302020-09-03T22:20:45+5:30

स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली.

It's finally a monkey! Head stuck in a steel cage .. Freedom after effort | शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता

शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता

Next
ठळक मुद्देपिलू दिवसभर आईला बिलगून


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मर्कटलीला करणे माकडाच्या पिलाच्या चांगलेच अंगलट आले. नसत्या उचापती केल्यामुळे स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुंदवाडा गावातील बुधवारची ही घटना. नेहमीप्रमाणे माकडाचा कळप शेतालगच्या घरांवर हुंदडू लागला. या कळपात अनेक पिले होती. त्यातील या पिलाने एका स्टीलच्या गडव्यात डोके घातले अन् गडवा त्याच्या डोक्यात अडकला. त्याला समोरचे दिसेनासे झाल्याने तो भेदरला. त्याच्या आईला बाळाची अडचण समजली. तिने गडवा डोक्यातून काढण्याचे नाना प्रयत्न केले. मात्र, काहीच साध्य झाले नाही. घाबरलेले पिलू आईला सोडेना. ते आईच्या कुशीत बिलगून बसले. मुंदवाडा गावातील जगदीश खेडकर यांनी ही घटना अमरावती वनविभागाला कळवली. वनविभागाची चमू तेथे दाखल झाली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर पिलाला पकडण्यात आले. त्याच्या गळ्यातून गडवा काढण्यात आला व त्याला पुन्हा कळपात सोडले गेले. रेस्क्यू टिमचे अमोल गावनेर यांनी ही माहिती दिली.

रेस्क्यू टीमने लढविली शक्कल
रेस्क्यू टिम गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह गावात पोहोचली. एकूण परिस्थिती पाहून गुंगी आणणारे इंजेक्शन 'ट्रँक्युलायझर' देणे टाळण्यात आले. यावर एक तोडगा काढण्यात आला. या कळपाला थकवायचे ठरले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी साडेदहा वाजता एका क्षणी पिलू माकडीणीपासून दूर झाले. त्याचक्षणी रेस्क्यू टिमने पिलास पकडले. आईपासून दूर नेले. त्याच्या डोक्यात अडकलेला स्टिलचा गडवा काढण्यात आला. या रेस्क्यू टिममध्ये पशुवैद्यकीय अधिकारी एच.टी जाधव, अमोल गावनेर, प्रभारीवनपाल मनोज माहूलकर, वनरक्षक सतीश उमप, वनरक्षक वैशाली सांळुके, वनमजूर वैभव राऊत, मनोज ठाकूर, आसिफ पठाण, गावकऱ्यांपैकी जगदीश खेडकर, अब्दुल जाहिद, सोयल शहा, किशोर मेश्राम, सोपान सयाम हे सहभागी झाले.

Web Title: It's finally a monkey! Head stuck in a steel cage .. Freedom after effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.