लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात स्मार्ट मीटर लावले जात आहेत. लावण्यात आलेल्या मीटरमुळे नागरिकांना अव्वाच्या सव्वा देयके येत असल्याने गोरगरीब नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात चमक बु, चमक खुर्द व देवरी येथील नागरिक विद्युत वितरण कंपनीवर धडकले. त्यांनी लावलेले मीटर काढण्याची मागणी कार्यकारी अभियंता यांना केली.
चमक खुर्द, चमक बुद्रुक, देवरी येथील घरांमध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत नागरिकांनी अचलपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांना भेटून निवेदन दिले. स्मार्ट मीटर लावल्यामुळे अव्वाच्या सव्वा देयके येत आहेत. मजुरी करणाऱ्या गरिबांना आर्थिक बोजा बसत असल्याने तत्काळ ते स्मार्ट मीटर काढण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा सरपंच पांडुरंग सोळंके, उपसरपंच उमेश रमेश ईखे, ग्रामपंचायत सदस्य अभिनव आगे, सदस्य सुनील मोरे, संदीप बरडे, दीपक पाटील, मयुर निकम, अमोल धर्माळे, दता महानकर, देविल जागळे, मंगेश देशमुख, प्रदीप पाटील, चंद्रशेखर आखुळ, सागर काटोले, देवेंद्र सांतंगे, नरेंद्र सांतगे व विलास पाटील यांनी दिला.
स्मार्ट मिटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव
सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरम पूर्ण असल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच गणपत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली सभेत ग्रामपंचायत चमक बु चमक बुव देवरी गावामध्ये लावण्यात आलेले स्मार्ट मिटर काढण्यात तसेच चमक बु व देवरी गावमध्ये काही प्रमाणात जुने मिटर बदलून न लावले आहेत तसेच शिल्लक कुटुबांना अजुनही स्मार्ट मिटर लावण काम चालू आहे. ती तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.