लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक स्तरावर दरवर्षी जन्माला येणाऱ्या २ हजार बालकांपैकी एक बालकामध्ये जन्मजात व्यंग असते. जन्मजात व्यंग हे अनुवांशिक तसेच गर्भधारणावस्थेत आईला आजार झाला असेल तर त्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळ जन्मापूर्वी अॅम्निऑसेन्टेसिस तपासणी करून गर्भातील बाळामध्ये काही व्यंगत्व तर नाही ना, याची चाचणी करता येते.
बदललेली लाइफस्टाइल, आहारात बदल आणि सतत करिअरच्या मागे धावणारी पिढी यामुळेच गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी वाढल्या आहेत. गर्भधारणा झाली तरी पूर्ण नऊ महिने बाळाची वाढ होऊन निरोगी बाळ जन्माला येईपर्यंत काळातही होणाऱ्या पालकांच्या मनावरचा ताण कमी होत नाही. वाढत्या वयामुळे उशिरा गर्भधारणा झाली तरीदेखील त्याचे परिणाम बाळावर होऊ शकतात. बाळाचा विचार करताना पुरुष आणि महिलांच्या काही टेस्ट करणे आवश्यक असतं. याशिवाय गर्भधारणा काळातही डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करायला हव्यात.
पालकांनी काय काळजी घ्यावी?कुटुंबामध्ये कोणी व्यंग असेल, तर पालकांनी होणाऱ्या बाळाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी वेळोवेळी आवश्यक चाचण्या कराव्यात.
कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात?
- वेळेवर वैद्यकीय तपासणी : गर्भधारणा झाल्यानंतर संबंधित महिलांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या तसेच सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळ निरोगी जन्माला येण्याची शक्यता वाढते.
- योग्य गर्भधारणेची काळजी : गर्भधारणा अवस्थेत आईने तिची व बाळाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आहाराकडे दुर्लक्ष करू नये. कोणत्याही प्रकाराचे व्यसनदेखील करू नये.
जन्मजात व्यंग म्हणजे नक्की काय ?जन्मजात व्यंग म्हणजे बाळ जन्माच्या वेळीच असलेल्या शारीरिक अडथळ्यांना जन्मजात व्यंग म्हणतात. ज्यामध्ये चालणे, बोलणे, शिकणे तसेच काही गंभीर आजार बाळाला जन्मजात असतात.
जन्मजात व्यंगाची कारणे कोणती?
- आनुवांशिकता : जन्मजात व्यंगाचे प्रमुख कारण हे आनुवांशिक आहे. घरातील कोणाला शारीरिक व्यंग असेल, तर अशावेळी त्या घरातील बाळ व्यंग घेऊन जन्म घेण्याची शक्यता असते.
- प्रदूषण, अल्कोहोल, धूम्रपान : सध्या वातावरणातील प्रदूषण तसेच ज्या महिला अल्कोहोल तसेच धूम्रपान करत असतील त्यांनादेखील बाळ जन्मजात व्यंग असण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
- गर्भधारणेदरम्यान चुकीची काळजी : गर्भधारण अवस्थेत संबंधित मातेने योग्य काळजी घेतली नाही, वेळोवेळी आवश्यक चाचण्या केल्या नाहीत किंवा यादरम्यान ती आजारी पडली तरी याचा परिणाम गर्भातील बाळावर होतो.
"बाळामध्ये जन्मजात व्यंग असण्याचे प्रमुख कारण हे आनुवांशिक आहे. त्यामुळे कुटुंबात असे कोणी असेल तर विशेष काळजी घ्यावी. तसेच गर्भधारण अवस्थेतदेखील संबंधित मातेने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे."- डॉ. भूपेश भोंड, बालरोगतज्ज्ञ