नगरपंचायतीवर ओढले ताशेरे, गढूळ पाणीपुरवठ्याकडे द्या लक्ष
तिवसा : शहरात डेंग्यूने अक्षरशः प्रकोप केला आहे. सहा दिवसांमध्ये तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नगरपंचायत प्रशासन टीकेचे धनी झाले आहे. याच मुद्यावर रविवारी दुपारी तत्कालीन ग्रामपंचायतीच्या तीन माजी सरपंचांंनी आनंदवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी यावेळी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तिवसा शहरात डेंग्यूसह साथरोगांनी थैमान घातले आहे. यात सर्वाधिक बालके डेंग्यूसह तापाने फणफणू लागले आहेत. त्यामुळे शहरात अस्वच्छता व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. तर नगरपंचायत प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे, याच परिस्थितीवर नगरपंचायतचे माजी नगरसेवक व माजी सरपंच असलेले प्रदीप गौरखेडे, अनिल थुल व भूषण यावले यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. यात त्यांनी पाहणीचे दोन व्हिडिओ व काही मजकूर लिहित ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यात त्यांनी पाणी दूषित होत आहे. पाणी पुरवठावर स्वच्छता नाही, असा आरोप केला. मजीप्रा विभागाने स्वतः पाहणी करावी. तिवसा नगरपंचायतच्या पाणीपुरवठा फिल्टर्स प्लांटवर ब्लिचिंग पावडर टाण्यासाठी स्वतंत्र रूम नसल्याने हजारो रुपयांची ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीसह एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ब्लिचिंग पावडर असते. ते जागीच पडून असल्याने खराब होत आहे, असा आरोपही करण्यात आला. नगरपंचायतच्या गलथान व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तिवसेकरांना अशुद्ध व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तिवसा शहरात आठवड्यापासून अनेकांना ''डेंग्यूने डँख "मारल्याने परिणामी ३ मुलांचा व १ महिलेचा मृत्यू झाला असेही यात मजकूर आहे. यात मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा पसरली असून यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात.
कोट
तिवसा शहरातील गलिच्छपणा-अस्वच्छतेमुळे व गढूळ पाणीपुरवठा'' या मुख्य कारणामुळे ''तिवसा शहर आजारी पडलेलं आहे.. पण निगरगट्ट प्रशासन व त्यांचा ढिसाळ नियोजनामुळे व नगरपंचायतचा बेजबाबदारपणाचा कळस झाला आहे आता तरी लक्ष द्यावे पाणीपुरवठाची प्रत्यक्ष पाहणी केली. यात धक्कादायक वास्तव दिसून आले.
- अनिल थूल, माजी सरपंच व माजी नगरपंचायत नगरसेवक