लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकता आभूषण या ज्वेलर्सच्या अमरावती, अकोला व परतवाडा येथील तीन प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने बुधवारी (दि. १४) धाडसत्र राबविले. या धाडीत नेमकी किती बेहिशेबी मालमत्ता, रोकड व दस्तऐवज जप्त झाले, याचा खुलासा करण्यास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तूर्तास नकार दिला. दरम्यान, या धाडसत्रामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक जयस्तंभ चौक मार्गावरील एकता आभूषण या प्रतिष्ठानाचे शटर दुपारपासून खाली ओढण्यात आले. सेल्ममन, वुमन्सना मात्र सुटी देण्यातआली आहे. बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत ते धाडसत्र सुरू होते.
सूत्रांनुसार, मोहित अटलानी यांच्या मालकीची अमरावती, अकोला व परतवाड्यासह यवतमाळ येथे एकता आभूषण ही सोने-चांदीच्या दागिन्यांची प्रतिष्ठाने आहेत. बुधवारी सकाळी आयकरच्या पथकाने अमरावती येथील जयस्तंभ चौक मार्गावरील सहकार भवन शेजारील प्रतिष्ठानासोबतच परतवाडा व अकोला येथील प्रतिष्ठानांवर छापे टाकले. त्यासाठी प्रत्येकी सहा अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. तीनही पथकांनी एकाच वेळी हे छापे टाकले. नागपूर व नाशिक येथील हे पथक असल्याचे समजते. या कारवाईत त्यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सामील करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागाचे साहाय्यक आयुक्त सतीश गावंडे व निरीक्षक राम प्रवेश यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, हा सर्व्हे असून, तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या काहीच जप्त करण्यात आले नसल्याचे समजते. अमरावतीत आयकर विभागाचे अधिकारी नागपूर पासिंगच्या वाहनाने आले आहेत.
अकोल्यात छापेमारीअकोला शहरातील चार ते पाच सराफा दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले. बुधवारी सकाळपासून सुरू असलेली छापेमारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. गांधी रोडवरील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आदी ठिकाणी ही छापेमारी झाल्याचे समजते. आयकर अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तसेच काही दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.