गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादन : कूप्रवृत्तीला तडीपार करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचार सक्षमअमरावती : मानवमुक्तीच्या जीवन व्यवहाराला लागू होणारे समतावादी व विज्ञानवादी विचार म्हणजे प्रबोधन, प्रबोधनाचे विचार प्रत्यक्षात अंमलात आले तरच महापुरुषांचे जीवन सार्थकी ठरेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेत तिसरे व शेवटचे पुष्प त्यांनी गुंफले. प्रबोधनाची प्रेरणा आणि माणूस हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण शेळके, व्याख्यानमालेचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव प्राचार्य स्मिता देशमुख आणि समिती सदस्य राजेश मिरगे उपस्थित होते. बनबरे यांनी हजारो वर्षांपासून बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्यांवर आगपाखड केली. भारतासारख्या समतावादी राष्ट्राला हिंदू राष्ट्र या संकल्पनेचे स्वरुप देणारे कुप्रवृत्त लोक अनेक वर्षांपासून शोषण करीत आहेत. त्यांना तडीपार करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचारांनी बळकट व्हावं, अशी सूचनाही त्यांनी केली. स्त्रीला शनीच्या चौथऱ्यावर जाण्यापासून रोखणारे खरोखर सुशिक्षित आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला. माणसाच्या विकासाच्या आड देणारा देव आम्हाला नको, असे भाऊसाहेबांनीच आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे ईश्वर व माणसातील दलालांना दूर करून माणसात देव शोधण्याचा प्रयत्न करा, असे वक्तव्य बनबरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून अरुण शेळके यांनी सांगितले की, प्रबोधनाचे विचार हृदयापर्यंत पोहोचले तर परिवर्तन निश्चित होईल. समाजप्रबोधनासाठी पारंपरिक कलेला भाऊसाहेबांनी चालना दिली. त्यातून बहिरमसारख्या यात्रेमध्ये शेतकरी व कलाकरांना एकत्र आणले. दूरदृष्टी असलेल्या भाऊसाहेबांचे देवस्थान बिल पास झाले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते. छत्रपती शिवाजी व गौतम बुद्धाचे विचार घेऊन भाऊसाहेबांनी प्रबोधन कार्य केले. त्या कार्याचा वसा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. प्रारंभी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्राचार्य स्मिता देशमुख, संचालन राजेश मिरगे व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी केले. यावेळी कार्यक्राला संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, कोषाध्यक्ष ह.बा.ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, दिलीप जाणे, प्राचार्य अरुण सांगोळे, अरविंद मंगळे, प्राचार्य चिखले, प्राचार्य ठाकरे, रमेश अंधारे, भी.रा. वाघमारे, किशोर फुले, गावंडे, प्राचार्य वनिता काळे यांच्यासह शिवाजी संस्थेचे आजीव सभासद, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रधोधनपर विचारांवर अंमल व्हावा
By admin | Updated: December 25, 2015 01:03 IST