अमरावती : शासकीय जागांवर परवानगी न घेता अवैध होर्डिंग्जची उभारणी राजरोसपणे सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर होर्डिंगची उभारणी होत आहे ती जागा वाहनतळासाठी राखीव असल्याची माहिती आहे. होर्डिंग्ज, फ्लेक्स उभारणीसंदर्भात उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिले आहेत. तरीदेखील महानगरात नियम वेशीवर टांगून अवैध होर्डिंग उभारले जात आहे. काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र महल्ले यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेऊन शहरात ३८ जागी अवैधरित्या होर्डिंंग्ज उभारले गेल्याची तक्रार केली होती. परंतु प्रशासनाने या अवैध होर्डिंग्जबाबत अद्यापपर्यंंत कोणतीही कारवाई केली नाही. होर्डिंंग्ज उभारायचे झाल्यास सहायक संचालन नगररचना विभाग व बाजार परवानाकडून रितसर मंजुरी प्राप्त करावी लागते. मात्र शहरात उभारले जात असलेल्या होर्डिंंग्ज मालकाकडून कोणतीही परवानगी न घेता अगोदर होर्डिंंग्ज उभारायचे, त्यानंतर परवानगीसाठी अर्ज करायचा, असा अफलातून प्रकार सुरु आहे. या प्रकाराला बाजार परवाना विभागाचे अभय असल्याचा आरोपही नगरसेवक राजेंद्र महल्ले यांनी केला होता. हल्ली बडनेरा जुनी वस्तीतील सावता मैदानलगत शासकीय जागेवर अवैध होर्डिंंग्ज उभारले जात आहे. या होर्डिंंग उभारणीला प्रशासनाने परवानगी दिली की नाही, हा विषय गुलदस्त्यात आहे. मात्र शासकीय जागेवर रस्त्यालगत दर्शनी भागात होर्डिंंग्ज उभारण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. परवानगी न घेता होर्डिंंग उभारणे हे नियमाला छेद देण्याचा प्रकार असताना प्रशासनाकडून हा प्रकार रोखण्यासाठी कोणतेही कठोर पाऊल महापालिकेकडून उचलले जात नाही, असे दिसून येते. महापालिकेच्या रेकॉर्डवर सावता मैदानलगतची जागा वाहनतळासाठी राखीव आहे. परंतु या जागेवर अवैधरित्या होर्डिंंग उभारले जात आहे. हा प्रकार कोण थांबविणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराच्या मुख्य चौकात आणि राष्ट्रीय महामार्गालगत परवानगी न घेता होर्डिंंगची उभारणी केली जात आहे. हा प्रकार वेळीच थांबविला गेला नाही तर शहराचे विद्रुपीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव आहे.
शासकीय जागांवर अवैध होर्डिंग्जची उभारणी
By admin | Updated: May 15, 2014 23:07 IST