अमरावती : दोन लाखांच्या मोबदल्यात एक किलो बनावट सोने देऊन अचलपूर येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली. येथील नाागपुरी गेट भागातील डीएड कॉलेजजवळ १ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी रात्री राजू सिंग (रा. राजस्थान) व अन्य एका अनोळखी इसमाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मुरारीलाल तांबी (५२,रा. चावडी मंडी, अचलपूर) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
मुरालीलाल तांबी यांचे अचलपूर येथे किराणा दुकान आहे. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या दुकानात दोन अनोळखी इसम किराणा घेण्यासाठी आले. त्यातील एका इसमाने त्यांना सुगंध घेण्यासाठी अत्तर दिले. त्याचवेळी आपण राजस्थानमधून रस्ता बांधकामावर मजूरी करण्यासाठी आलो असून, आम्हाला खड्डे खणताना सोन्यासारखी वस्तू मिळाली आहे,ते तुम्ही विकत घेता का, अशी बतावणी त्यांनी केली. त्याने स्वत:चे नाव राजूसिंग असे सांगत मोबाईल क्रमांकाची देवानघेवाण केली. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी रात्री आपण राजू सिंग बोलत असून, त्याने तांबी यांना १ सप्टेंबर रोजी नागपुरी गेट चौकात बोलावले.
अरे हे तर बनावट सोने
त्यानुसार तांबी व त्यांचा मुलगा दोघेही दुपारी चारच्या सुमारास तेथे पोहोचले. काही वेळाने राजुसिंगदेखील पोहोचला. त्यांच्यात सोन्याविषयी बोलणे झाले. काही वेळाने अध्यापक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राजू सिंग याने बोलावलेला इसम आला. त्याने तांबी पितापुत्राला पिवळ्या रंगाचा धातू असलेला हाराचा गुच्छा सोने म्हणून दिला. त्याबदल्यात तांबी यांनी त्या दोन भामट्यांना २ लाख रुपये दिले व ते दुचाकीने अचलपूरला निघून गेले. अचलपुरला पोहोचल्यानंतर भामट्यांनी दिलेला हाराचा गुच्छा सोने नसून ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर १० सप्टेंबर रोजी यात तक्रार दाखल करण्यात आली.