१४ आदिवासींचा हैद्राबाद ते देवगाव उपाशीपोटी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:54+5:30

गावात रोजगार नसल्याने मेळघाटातील आदिवासींचे लोंढे शहराकडे काही वर्षांत आले. हेद्राबाद येथे मेळघाटातील आदिवासी पाच युवक दोन वर्षांपासून काम करतात. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश 'लॉक डाऊन' झाला आहे. त्यामुळे या आदिवासी युवकांना येथून हाकलून देण्यात आले. नऊ आदिवासी युवक वर्धा जिल्ह्यात मांडवा परिसरात समृद्धीच्या कामावर होते. तेथूनही त्यांना काढून देण्यात आले.

Hungry 14 Tribes travel from Hyderabad to Devgaon | १४ आदिवासींचा हैद्राबाद ते देवगाव उपाशीपोटी प्रवास

१४ आदिवासींचा हैद्राबाद ते देवगाव उपाशीपोटी प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवस : ४६१ किलोमीटर अंतर केले पार

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पोटाची खळगी भरण्याकरिता ठेकेदाराकडे काम करण्यास गेलेल्या आदिवासी युवकांचा तब्बल ४६१ किलोमीटर प्रवास अनेकांना थक्क करणारा आहे. कोरोनाच्या भीतीने सर्व देश 'लॉक डाऊन' झाला आहे. ज्या ठेकेदाराकडे कामाला होते, त्यानेही हाकलून दिले. वाहनही उपलब्ध होऊ न शकल्याने अखेर हैदराबादहून समुद्रपूरपर्यंत काही पायदळ, तर काही मिळेल त्या वाहनाने आले. तेथून धामणगाव तालुक्यातील देवगावपर्यंत तीन दिवसांचा प्रवास १४ आदिवासींनी उपाशीपोटी केला.
गावात रोजगार नसल्याने मेळघाटातील आदिवासींचे लोंढे शहराकडे काही वर्षांत आले. हेद्राबाद येथे मेळघाटातील आदिवासी पाच युवक दोन वर्षांपासून काम करतात. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश 'लॉक डाऊन' झाला आहे. त्यामुळे या आदिवासी युवकांना येथून हाकलून देण्यात आले. नऊ आदिवासी युवक वर्धा जिल्ह्यात मांडवा परिसरात समृद्धीच्या कामावर होते. तेथूनही त्यांना काढून देण्यात आले. अखेर कोरोनामुळे आपले गावच बरे गड्या म्हणून हे आदिवासी युवक गावी परण्याकरिता धडपडले. परंतु, वाहन मिळाले नाही. अखेर हैदराबादहून मिळेल त्या वाहनाने, तर काही अंतर पायी गाठत आले. पोटात अन्न नाही, तर दिवसरात्र गावाची ओढ लागल्याने शुक्रवारी ते १४ आदिवासी मजूर धामणगाव तालुक्यातील देवगाव येथे पोहोचले. पेट्रोलिंग करताना तळेगाव दशासर येथील ठाणेदार रीता उईके यांना ते आढळले. त्यांना चार दिवसांपासून जेवण मिळाले नव्हते. ठाणेदारांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांना कळविण्यात आले. उशिरा रात्री त्या आदिवासी युवकांना धामणगाव येथे आणले. येथे विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या भोजन समितीने त्यांची जेवणाची व तालुका प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली. शनिवारी सकाळी नगर परिषदेत त्यांना पुन्हा जेवण दिल्यानंतर तालुका प्रशासनाच्यावतीने अचलपूरपर्यंत पोहोचून देण्यात आले. तेथून धारणी येथील तालुका प्रशासन त्यांच्या गावापर्यंत पोहचून देणार असल्याचे सांगण्यात आले. चार दिवसांपासून उपाशी असलेल्या आदिवासी मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था धामणगाव येथील सामाजिक संघटनेच्यावतीने भोजन समितीने केल्याने या सामाजिक संस्थेचे कौतुक होत आहे.

Web Title: Hungry 14 Tribes travel from Hyderabad to Devgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.