गैरप्रकार : वरिष्ठ मंडल प्रबंधकांकडे तक्रारधारणी : येथील विमा पॉलिसी धारकाने प्रिमीयमची रक्कम अमरावती येथील अधिकृत विमा एजंटांकडे विमा पॉलिसीत भरण्यासाठी दिली. मात्र, संबंधित एजंटने गेल्या तीन वर्षापासून खातेदारांची रक्कम न भरता स्वत: हडप करुन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. यासंदर्भात विमा धारकाने एलआयसीचे वरिष्ठ मंडल प्रबंधक यांच्याकडे रितसर तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.धारणी येथील राजेंद्र मंगलप्रसाद जैस्वाल हे २०१० पासून विमाधारक आहेत. त्यांनी गेल्या चार वर्षांचा सहा महिन्यांचा पूर्ण हप्ता २०१४ पर्यंत अधिकृत विमा प्रतिनिधी नरेंद्र गाढे यांचेकडे जमा केला. पावती मागितली असता अमरावती कार्यालयात जमा आहे, असे खोटे उत्तर देऊन एकही हप्ता विमा प्रतिनिधीने भरला नाही. त्यामुळे पॉलिसी बंद झाली. हे विमा प्रतिनिधी गाढे यांच्या लक्षात येताच त्यांनी जैस्वाल यांना अमरावतीला बोलावून त्यांची दिशाभूल करुन मेडिकल तपासणी करुन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यांचे नावे एलआयसी कार्यालयात खोटा अर्ज भरुन बंद पडलेल्या पॉलिसीत एसबीड्यूच्या रकमेचा धनादेश काढून तेथेच जैस्वाल यांच्या पॉलिसीत जमा करण्याचा प्रयत्न केला. ही बाब जैस्वाल यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ एलआयसीच्या वरिष्ठ मंडल प्रबंधक व शाखा प्रबंधकाकडे आपली एसबीड्यूची रक्कम मला न मिळता विमा प्रतिनिधी गाठे ते थेट पॉलिसीत जमा केली. तसेच माझ्याकडून चार वर्षाच्या विमा हप्त्याची रक्कमही हडपली. हा गंभीर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लेखी तक्रार करण्याचे सांगितले. त्यावर जैस्वाल यांनी विमा प्रतिनिधी नरेंद्र गाढे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचेवर फौजदारी कारवाई करुन न्यायाची मागणीची तक्रार २६ जून रोजी केली आहे. परंतु तक्रारकर्त्याला अद्याप न्याय मिळाला नसल्याने पॉलिसी धारकात तीव्र असंतोष खदखदत आहे. (शहर प्रतिनिधी)
विमा पॉलिसी धारकाची रक्कम हडपली
By admin | Updated: July 8, 2014 23:14 IST