अमरावती : अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातून बहुतांश शेतकरी सिंचनासाठी आवश्यक पाण्याची मागणी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सिंचनासाठी राखीव असलेले २०० दलघमी पाणी सिंचनासाठी पुरेसा प्रमाणात वापरले जात नसल्याने ते पाणी अन्यत्र वळविले जाते आणि त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पाचे फावते, अशी माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी उद्युक्त केले आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पातून सिंचनाचे पाणी घेण्यासाठी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, पाणी हमखास मिळेल आणि हा प्रकल्प या भागातील नागरिकांना अधिक सुजलाम् सुफलाम् करेल, असा आशावाद जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे हा प्रकल्प वरदान ठरला असताना प्रकल्पाच्या पाणी वापरकर्त्यांबद्दल त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली आहे. पाणी मागणी अधिकाधिक आल्यास अन्यत्र पाणी देण्याचा विषयच उरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १,०४,४०० हेक्टर असताना आतापर्यंत ७५,०४० हेक्टरची सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. अधिकाधिक सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी समोर येण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)काय म्हणतात अधीक्षक अभियंता ?हंगामापूर्वी लाभधारक पाणी मागणीपत्र देत नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्थापन कोलमडते. पाणी वापर संस्था अद्याप सक्षम आणि पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या नाहीत. सिंचन कायदा २००५ अन्वये सिंचन व्यवस्थापन पूर्णत: लाभधारकांकडून होणे अपेक्षित आहे. यामुळे पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्यांतर्गत नोंदणी होऊन कार्यान्वित होणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे बिगर सिंचन पाणी वापरकर्ते घरगुती वापराकरिता नियमित पाणी घेतात. परंतु वार्षिक करारनामे व पाणीपट्टीचे भुगतान याबाबत मात्र उदासीनता दाखवितात. यामुळे प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी प्राप्त होत नाही, ही जलसंपदा विभागाची शोकांतिका असल्याचे अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी म्हटले आहे.पाणी वापर संस्था माध्यमज्या शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व किंवा हंगामात कधीही सिंचनासाठी पाणी आवश्यक असेल त्यांनी ७ क्रमांकाचा अर्ज भरावा. हे अर्ज सर्व सिंचन शाखा कार्यालय तथा तालुकास्तरावर सिंचन उपविभागात उपलब्ध आहेत. मात्र हे पाणी मागणी अर्ज पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून येणे आवश्यक आहेत. हवे असलेले पीक घेण्याची मुभा या शेतकऱ्यांना आहे. कुठल्याही कालावधीत पाणी मागणी करणे शक्य आहे. तथापि त्यासाठी क्षेत्र एकत्रित असावे.पाणी वापर संस्था बोटावरपाणी मागणीसाठी पाणी वापर संस्था पुरेशा पुढे येत नाहीत. पाण्याचे नियोजन नाही, त्यामुळे आपसी हेवेदावे सोडून पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, जेणेकरून सिंचनाचा टक्का वाढेल, त्यामुळे पाणी वापर संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी पाणी वापर संस्थांना बळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
म्हणून विद्युत प्रकल्पाचे फावले..
By admin | Updated: March 18, 2016 00:08 IST