लेहेगाव (रेल्वे) : दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत. पोटासाठी श्रमाची कामे करण्यास बाध्य असलेल्या मजुरांचे उन्हामुळे हाल होत आहेत. वातावरणात होत असलेला बदल हा आरोग्यासाठी हानीकारक ठरला आहे. कधी ऊन तर कधी पाऊस, अशी स्थिती असल्याने वातावरणाचा समतोल बिघडला आहे. हे नागरिकांसह पाळीव आणि वन्य प्राण्यांसाठी सुध्दा हानिकारक ठरत आहे. अधिक प्रमाणात उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पोटासाठी उन्हातान्हात काम करणे गरजेचे असल्याने मजुरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अधिक पाणी पिणे, पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे आवश्यक आहे. उन्हात जाताना डोक्याला दुपट्टा किंवा रूमाल बांधल्याने उन्हापासून बचाव करू शकतो. उन चांगलेच कडाडल्याने ग्रामस्थ शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत आहेत. यंदा अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे यंदा कपाशीचा हंगाम वाढला आहे. लेहेगाव परिसरात अजूनही कपाशी वेचणीसाठी मजूर शेतात जात आहेत. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे मजूर शेतात काम करतात. कडाडलेल्या उन्हामुळे या मजुरांना अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. परिणामी रूग्णालयांमध्ये गर्दी वाढली असून उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हापासून बचाव करण्याचे उपाय ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)उष्माघाताच्या बचावासाठी पांढरे व सैल कपडे घालावेत. तसेच डोके आच्छादून उन्हात निघाल्यास उष्माघाताची शक्यता मंदावते. उन्हाचा पारा वाढल्याने ऊन लागणे, थकवा येणे, उलट्या होणे, हे विकार संभवतात. ए.जी. देवतळेआरोग्य सेविका, आरोग्य केंद्रलेहेगाव (रेल्वे)आम्ही शेतात कापूस वेचणी करण्यासाठी जात असतो. सकाळी १० वाजेपर्यंत ऊन कमी असते परंतु त्यानंतर पारा वाढतो पण, मजुरीसाठी शेतात जावेच लागते. - एक शेतमजूरलेहेगाव (रेल्वे)
उन्हाच्या तडाख्याने मजूरवर्ग हैराण
By admin | Updated: April 28, 2015 00:11 IST