अमरावती : जिल्हा परिषदेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची जिल्हा शाखा पुढे आली आहे. या शाखेने प्रत्येक तालुक्यातील दोन आणि जिल्हास्तरावर चार अशा ३२ पदाधिकाऱ्यांची नेमणूक याकरिता केली आहे. हे पदाधिकारी त्या-त्या तालुक्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतरचे हीच लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.
कोरोनाकाळात मार्च २०२० पासून जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कोरोनाने, तर काही कर्मचारी इतर आजारांनी दगावले. नेमके याच काळात सरकारी निर्बंध असल्यामुळे बहुतेक कार्यालये पूर्ण वेळ आणि क्षमतेने उघडली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही दस्तऐवज प्राप्त करून घेण्यात त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने समिती स्थापन केली. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव राजेश रोंघे, लिपिक कर्मचारी संघटनेचे सचिव संजय राठी, सदस्य राजू गाडे, सुनील शिराळकर व विजय घोटाळे हे अमरावती व जिल्हास्तरीय मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. याशिवाय धारणीत योगेश मालवीय, पंकज आसरे, चिखलदऱ्यात गजानन केंद्रे, संजय गोहत्रे, अचलपूरमध्ये सुभाष जाधव, शीतल दहातोंडे, अंजनगाव सुर्जी येथे प्रशांत गावंडे, नितीन पवार, दयार्पूरमध्ये तुषार पावडे, गजानन गोहत्रे, चांदूर बाजारात संजय येऊतकर, मनीष टेंभरे, वरूडमध्ये राहुल हरले, अविनाश हुसे, मोर्शी विलास दुपारे, समीर चौधरी, तिवस्यात नीलेश दहातोंडे, संजय मुंद्रे, धामणगाव रेल्वेत राजेश पवार, हेमंत यावले, चांदूर रेल्वे येथे प्रशांत धर्माळे, योगेश मालखेडे, नांदगाव खंडेश्वर येथे मंगेश मानकर, वीरेंद्र गलफट आणि भातकुलीकरिता सी.डी. देवपारे व बाळासाहेब मोथरकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.
कोट
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनातर्फे कोणते लाभ दिले जातात, हे बहुतेक कुटुंबांना माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ती कोणाकडे आणि किती कालावधी सादर करावी लागतात, याची माहिती नसते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कर्तव्य म्हणून हा उपक्रम सुरू केला.
पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन