अमरावती : महापालिकेत लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षात उफाळलेले व्दंद युध्द न्यायालयात पोहोचले असून यातील खोडके गटाच्या सदस्यांच्या अपात्रतेसोबतच गटनेते पदावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये फूट पडली. एक गट खोडके गटाला सलंग्न झाला तर दुसरा राष्ट्रवादी पक्षासोबत कायम राहिला. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाईचा आरोप करुन खोडके गटातील चेतन पवार, मिलिंद बांबल, रीना नंदा तसेच गटनेते अविनाश मार्डीकर यांच्याविरुध्द विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला. त्यांना अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाला आव्हान देणारी प्रोटेक्शन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणातील याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे व त्यांचे वकील जयेश वैष्णव यांनी दिली. तत्कालीन विभागीय आयुक्त दत्तात्रेय बनसोड यांनी सर्वोच्च न्यायालय व कोकण विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाचा आधार घेत खोडके गटातील नगरसेवकांविरुध्द अपात्रतेचा आणि गटनेतेपदाचा निर्णय दिला होता. या निर्णयावरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. याचवेळी खोडके गटाच्या सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
खोडके गटातील सदस्यांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST