झेडपी :आरोग्य विभागातर्फे ४१ पथक तैनात अमरावती : आरोग्यासंदर्भात अतिसंवेदनशील असलेल्या मेळघाटातील सर्व गावांत बालमृत्यू, मातामृत्यू तसेच साथीचे रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाव्दारे मान्सूनपूर्व सर्वेक्षण (झोन) अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १६ एप्रिलपासून राबविण्यात येत आहे. यासाठी मेळघाटातील ३२४ गावांची तपासणी करण्याकरिता ४२ डॉक्टरांचे पथक गठित करण्यात आले आहे. मेळघाटात दरवर्षीच पावसाळयात साथीच्या रोगांची लागण होते. बालमृत्यू, मातामृत्यू होतच असतात. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत प्रत्येक गावात तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मेळघाटातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कुटंूबातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाते. याकरिता आरोग्य विभागाकडून ४१ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय आणि ६ ते ७ आरोग्य कर्मचारी समाविष्ट आहेत. अभियानांतर्गत प्रत्येक घरी जाऊन तपासणी व उपचार करण्यात येत आहेत. अति जोखमीच्या मातांना व बालकांना संदर्भ सेवा सुध्दा देण्यात येणार आहे. सलग दहा दिवस हे मान्सूनपूर्व झोन अभियान चालणार आहे.असे राबविले जात आहेत उपक्रमझोन अभियानात गरोदर मातांची संपूर्ण तपासणी बालकांचे लसीकरण, 'अ' जीवनसत्वाचा डोज, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, पाईप लाईन लिकेजेसचे सर्वेक्षण व पाणी नमुने, ब्लिचिंग पावडर नमुने संकलित करणे, कुष्ठरूग्ण, क्षयरूग्ण यांचे नियमित उपचाराबाबत खात्री करणे, तापाच्या रूग्णांचे रक्त नमुने घेणे, दायींच्या बैठकी घेऊन त्यांचे ज्ञान कौशल्य व त्यांच्याकडील प्रसूतीविषयक साहित्याची पडताळणी करणे, आरोग्य, शिक्षण माहिती व संदेशवहन कार्यक्रमांतर्र्गत बैठकी आयोजित करून मातांना आहार, आरोग्यविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
झोन अभियानांतर्गत मेळघाटात आरोग्य तपासणी
By admin | Updated: April 28, 2015 00:09 IST