अमरावती: येथील अमरावती मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहातून पसार झालेल्या जन्मठेपेच्या कैद्याला अटक करण्यात फ्रेजरपुरा पोलिसांना यश आले. बद्री रिच्छु मुजादे (३२, रा. भिकनगाव जजगर, ता. भिकनगाव, जि. खरगौन, मध्यप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो १२ जून रोजी दुपारच्या सुमारास तेथील सुरक्षारक्षकांच्या हाती तुरी देऊन पसार झाला होता. त्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कारागृह हवालदार संजय मोहोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. फ्रेजरपुरा पोलिसांनी सुमारे ३०० किमीहून त्याला येथे आणले. प्रशासकीय प्रक्रियेनंतर त्याला कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
कारागृह हवालदार संजय मोहोड हे १२ जून रोजी सकाळी ७.१० च्या सुमारास बगीच्याच्या कामाकरिता खुल्या कारागृहातील १८ कैदी घेवुन गेले होते. काम आटोपल्यावर दुपारी तीन ते ३.४५ च्या दरम्यान खुले कारागृहातील त्या १८ कैद्यांना ते मेनगेट येथे घेऊन गेले. तेथे कैद्यांची गिनती केली असता शिक्षाबंदी बद्री मुजादे हा लघवीला जातो, असे म्हणून तेथून लघवीला निघून गेला. मात्र तो परत आला नाही. त्याचा कसून शोध घेण्यात आला. धारणी पोलिस ठाण्यात नोंद खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला वर्षभरापूर्वी खुल्या कारागृहात स्थलांतरित करण्यात आले होते.
यांनी केली कामगिरी
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश गावंडे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, एएसआय योगेश श्रीवास, अंमलदार हरीश चौधरी, शशिकांत गवई, जयेश परिवाले, रोशन वऱ्हाडे, चालक उमेश चुलपार यांनी ही कारवाई केली. पसार कैद्याला २१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. तथा त्याला २२ रोजी अमरावतीत आणण्यात आले.