प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. या सुंदर पायविहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये २ कोटी ८८ लाख ८१ हजार ५१० रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी ९३.२७ लाख रुपयांचा निधी २७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. या निधीतून त्या ऐतिहासिक पायविहिरीचा मेकओव्हर होणार आहे.
महिमापूरस्थित पायऱ्यांची विहीर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या २ कोटी ८८ लाख ८१ हजार ५१० रुपये इतक्या रकमेच्याअंदाजपत्रकास सन २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ते काम तुमसर येथील एका कंत्राटदाराने २.६७ कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. त्या कामास सुरुवात झाली असून, २७ फेब्रुवारी रोजी एकूण खर्चापैकी ९३.२७ लाख रुपयांच्या प्रथम देयकासदेखील मान्यता देण्यात आली आहे. या ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्तीची कामे ही विशिष्ट प्रकारची असून, ती कामे पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार करणे आवश्यक आहे.
पोस्ट कार्डवर झळकली होती विहीरराष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून केंद्रीय टपाल विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये या विहिरीचे छायाचित्र पोस्ट कार्डवर झळकल्याने ही पायविहीर राष्ट्रीय नकाशावर आली आहे. तथापि, जिल्ह्याचे वैभव असलेली ही विहीर दुर्लक्षितच होती. पुरातत्त्व विभागाच्या लेखी राज्य संरक्षित स्मारक म्हणून या विहिरीची नोंद असली तरी विहिरीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते; मात्र आता सुमारे २.८८ कोटींमधून विहिरीचे जतन केले जाणार आहे.
अशी आहे रचना
- अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर हे गाव आहे. याच गावात ही ऐतिहासिक विहीर आहे.
- संपूर्ण दगडाचे बांधकाम. चौकोनी आकार. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या.
- पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था.
अमरावती जिल्ह्याच्या 'गॅझेटियर'मध्ये नोंदविहिरीचे आतील बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना, आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती, अशी या विहिरीची रचना आहे. ही विहीर मुघलकालीन असल्याचा उल्लेख अमरावती जिल्ह्याच्या 'गॅझेटियर'मध्ये आहे. जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती.